अंबरनाथः पदपथ, कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि पालिकेच्या आरक्षित भुखंडांवरील अतिक्रमणे अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरूवारी जमिनदोस्त केले. यावेळी अनधिकृत बांधकामे आणि फुटपाथावरील टपऱ्यांंवरही कारवाई करण्यात आली. शहरातील मुख्य रस्ते आणि आरक्षणाच्या जागांवर वाढलेले अतिक्रमण नागरिकांच्या गैरसोयीचे ठरत असल्याने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मात्र यातून सण उत्सवांच्या निमित्ताने रस्ते अडवणाऱ्यांना सोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

गेल्या काही महिन्यात अंबरनाथ शहरात अतिक्रमणांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. पदपथांवर फेरिवाले, विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. तर महत्वाच्या चौकात, रस्त्याच्या कडेलाही अतिक्रमणे वाढल्याचे दिसून आले होते. शहरातून जाणारा आणि वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला कल्याण बदलापूर राज्यमार्गही यातून सुटला नव्हता. राज्यमार्गावर विविध ठिकाणी अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. मात्र त्यावर कारवाई केली जात नव्हती. अखेर गुरूवारी अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या वतीने अंबरनाथ शहरातील विविध भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

यावेळी अंबरनाथ पश्चिम दर्गा परिसरातील तब्बल २० टपऱ्यांसह एका अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात आली. याशिवाय मोरिवली गाव भागात महामार्गालगत फुटपाथावर उभारण्यात आलेली मटण तसेच चिकन विक्री दुकाने, एका मटका दुकानावर तोडक कारवाई केली गेली.

पालिकेचे आरक्षित भुखंडही मोकळे

अंबरनाथ नगरपालिकेच्या आरक्षित भुखंडांवरही गेल्या काही दिवसात अतिक्रमण होत असल्याची बाब निदर्शनास आली होती. अंबरनाथ पश्तिमेतील कोहोजगाव येथे आरक्षण क्रमांक १४, १५ आणि १६ या खेळाचे मैदान तसेच उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेवर सात अनधिकृत दुकाने आणि गाळे उभारण्यात आले होते. या सर्व गाळ्यांवर कारवाईची मागणी होती. या गाळ्यांवरही आज कारवाई करत हे गाळे जमीनदोस्त करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशान्वये अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र संख्ये तसेच त्यांच्या पथकाने केली. यावेळी कारवाईदरम्यान नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांना अभय का ?

गणेशोत्सवापासून शहरातल्या विविध भागात अंतर्गत रस्त्यांवर रस्ते अडवून स्वागत कमानी उभारल्या गेल्या आहेत. शहरातील विविध भागात अनधिकृत बॅनरही लावण्या आले आहेत. तर शहराच्या महत्वाच्या चौकांमध्ये अजुनही टपऱ्या आणि अतिक्रमणे आहेत. त्या अतिक्रमणांवर कारवाई कधी असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. तसेच आता केलेल्या कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, यावरही लक्ष ठेवण्याची मागणी होते आहे.