अंबरनाथः अंबरनाथ शहरात गेल्या काही महिन्यात झालेल्या घटनांनंतर शहरातील विविध घटकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जामीनावर सुटलेल्या आरोपींना पोलीस ठाण्यात पाचारण करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसात अंबरनाथ आणि आसपासच्या भागातून ३० हून अधिक जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते आहे.
अंबरनाथ शहरात गेल्या काही महिन्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुन्हेगारांकडून झाला. शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर बेछूट गोळीबार करण्याची घटना अंबरनाथ पूर्वेतील हुतात्मा चौक परिसरात समोर आली होती. याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र या आरोपींना पकडण्यापूर्वी त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर येथील एका राजकीय व्यक्तीच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा प्रकारही समोर आला होता. या सर्व प्रकारानंतर शहरात राजकीय व्यक्ती, व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
त्यातच जामिनावर सुटलेल्या एका सराईत गुन्हेगाराकडे अग्नीशस्त्र आढळून आले. या गुन्हेगारावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. या सर्व प्रकारानंतर शहरभर खंडणीचा प्रकार सुरू आहे की काय, अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे अंबरनाथ शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे या सर्व अप्रत्यक्ष दहशतीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली. त्यानुसार परिमंडळ चार, उल्हासनगरच्या वतीने पोलीस पथके सक्रीय करण्यात आली आहेत. अंबरनाथ शहरात आणि परिसरात जामीनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसात सुमारे ३० हून अधिक गुन्हेगारांना पोलिसांनी ठाण्यात पाचारण केले आहे.
परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्तांनी मंगळवारपासून काही गुन्हेगारांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे या गुन्हेगारांचे पडद्यामागचे पाठीराखे मात्र चिंतेत आले आहेत. या आरोपींकडून जामीनाच्या काळात कोणत्याही गुन्ह्यात सहभागी होणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्रही गुन्हेगारांकडून लिहून घेतले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ माजली आहे.
अंबरनाथ शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जामिनावरील आरोपींना बोलावून त्यांची चौकशी केली जाते आहे. तसेच त्यांच्याकडून चांगल्या वर्तुवणुकीबाबत प्रतिज्ञापत्र (बॉन्ड) घेतले जात आहेत. यानंतरही एखाद्या गुन्ह्यात या आरोपींचा समावेश आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – सचिन गोरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार