ठाणे – ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून अंबरनाथ येथे जिल्हा परिषदेचा पहिला मॉल उभा राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ तालुक्यातील बेलवली भागात मॉलकरिता जागा निश्चित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मॉल उभारण्या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यामतून बचत गटाची चळवळ उभी केली आहे. या चळवळीच्या माध्यमातून महिलांचा घराला आर्थिकदृष्ट्या हातभार लागत आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १०,८०० महिला बचत गट सक्रिय आहेत. प्रत्येक गटात १० ते १९ महिलांचा सहभाग आहे. यामुळे एकूण १,१७,००० महिला या महिला बचत गटांमार्फत उद्यमशीलतेकडे वाटचाल करत आहेत. या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी जिल्हा परिषदेचा पहिला मॉल उभा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विभागीय, जिल्हास्तरीय आणि मिनी सरस विक्री प्रदर्शन आयोजित केली जातात. यंदाही या उपक्रमाचे आयोजन ठाण्यातील गावदेवी मैदानात करण्यात आले होते. या उपक्रमांद्वारे महिला बचत गटांना विक्री व प्रसिद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध होत असते. गावदेवी मैदानात पार पडलेल्या या उपक्रमात १८८ महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला होता. तर, या प्रदर्शन आणि विक्रीतून ६७ लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.

परंतू, असे असले तरी, महिलांनी तयार केलेल्या या उत्पादनाला कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरिता शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या पुढाकाराने ठाणे जिल्हा परिषदेने अंबरनाथ तालुक्यातील बेलवली येथे मॉल उभारण्याची योजना आखली आहे. त्यासाठी प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचा पहिला मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. – रोहन घुगे, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे