डोंबिवली येथील पूर्व भागातील उर्सेकरवाडी भागात एका रुग्णवाहिका चालकाला फेरीवाल्यांच्या एका गटाने गुरुवारी बेदम मारहाण केली. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयित फेरीवाल्यांना ताब्यात घेतले आहे.

डोंबिवली पूर्व भागात ग आणि फ प्रभागांकडून फेरीवाल्यांवर दोन महिन्यांपासून सतत कारवाई सुरू आहे. कारवाई पथके दुसऱ्या रस्त्यावर कारवाईसाठी गेले की फेरीवाले पुन्हा रस्त्यावर येऊन बसतात. पूर्व भागात फेरीवाल्यांची मुजोरी मोडून काढण्यासाठी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे, पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे, फ प्रभागाचे भरत पाटील, पथक प्रमुख मुरारी जोशी यांनी आक्रमक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईने फेरीवाले संतप्त आहेत. त्याचा राग त्यांनी रुग्णवाहिका चालकावर काढला.

रुग्णवाहिका चालक गणेश माळी (३०, रा. भोपर) गुरुवारी संध्याकाळी एका रुग्णाला घेण्यासाठी डोंबिवली पूर्वेतील उर्सेकरवाडीतील एका रुग्णालयात आले होते. रुग्णवाहिका रुग्णालयासमोर लावण्यासाठी जागा नसल्याने माळी यांनी उर्सेकरवाडीत रुग्णालयाजवळ लपून व्यवसाय करत असलेल्या फेरीवाल्यांना सामान बाजुला घेण्यास सांगितले. त्याचा राग येऊन फेरीवाल्यांनी संघटित होऊन माळी यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, मस्जिदबंदर, भायखळा, अंधेरी भागातील आहेत. मारहाणी नंतर फेरीवाले पळून गेले. त्यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.