scorecardresearch

डोंबिवली : भोपर गावातील घर जळीतामधील महिला आणि तिच्या मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न ; महिलेचा मृत्यू

डोंबिवली जवळील भोपर गावातील एका घराला आग लागून घरातील एक महिला, दोन मुली शनिवारी होरपळून भाजल्या होत्या.

डोंबिवली : भोपर गावातील घर जळीतामधील महिला आणि तिच्या मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न ; महिलेचा मृत्यू
( संग्रहित छायचित्र )

डोंबिवली जवळील भोपर गावातील एका घराला आग लागून घरातील एक महिला, दोन मुली शनिवारी होरपळून भाजल्या होत्या. या दुर्घटनेतील महिलेचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.या महिलेच्या भावाने मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत या महिलेचा पती प्रसाद पाटील याने आपली बहिण प्रीती (३५) हिचा शारीरिक मानसिक छळ करुन तिच्या दोन मुली समीरा (१४), समीक्षा (११) यांना कोणत्या तरी ज्वलनशील पदार्थाने जाळून त्यांना जिवंत ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, अशी तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी संध्याकाळी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : देशपातळीवर राज्यात ठाणे महापालिकेचा तिसरा क्रमांक; ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रम

पोलिसांनी सांगितले, पेण जवळील वाशी सरेभाग येथील रहिवासी असलेल्या प्रीती हिचा २००७ मध्ये भोपर गावातील प्रसाद पाटील याच्या बरोबर विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. प्रसादचे अन्य एका महिले बरोबर प्रेम संबंध असल्याचे प्रीतीच्या लक्षात आले. तिने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. त्याने काहीही ऐकले नाही. त्यानंतर तो प्रीतीला शारीरिक मानसिक त्रास देऊ लागला. मुलींना नियमित मारझोड करू लागला, असे मयत प्रीतीचा भाऊ किशोर पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रसाद याने सुखाने संसार करावा म्हणून त्याला वेळोवेळी समजविण्यात आले. गेल्या आठ दिवसापूर्वी प्रीतीच्या माहेरच्या मंडळींनी भोपर येथे येऊन प्रसादची समजूत घालून त्यांना सुखाने राहण्याचे समजावले होते. परंतु यावेळी प्रसाद याने प्रीतीच्या माहेरहून आलेल्या मंडळींना धमकावले होते. तुम्ही या भानगडीत पडू नका असा इशारा दिला होता. तुम्हाला खोट्या गुन्हयात अडकविण्याची धमकी दिली होती. प्रीती आणि तिच्या दोन्ही मुलींनी प्रसाद पासून आपल्या जीवाला धोका असल्याचे माहेरच्या लोकांना सांगितले होते. अनेक वेळा प्रसाद चार पाच दिवस घरी येत नाही, असे प्रीती सांगत होती, असे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये मोहन अल्टिजा इमारतीत आग; दोन सदनिका जळून खाक, कोणतीही जीवित हानी नाही

या प्रकरणात अंतीम तडजोड करण्यासाठी किशोर पाटील आणि प्रसाद यांनी ठरविले होते. त्यावेळी प्रसाद आता नवरात्र चालू आहे त्यानंतर आपण भेटू किशोर यांना सांगितले. ही संधी साधत त्याने शनिवारी सकाळी घराला आग लावून बहिण प्रीती, तिच्या दोन मुलींना प्रसादने जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. प्रसाद याच्या घराला सकाळी साडे सहा वाजता आग लागल्यानंतर पोलिसांना ही माहिती सकाळी आठ वाजता देण्यात आली. त्यावेळीच पोलिसांना या घटनेबद्दल संशय आला होता.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या