भगवान मंडलिक
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून डोंबिवलीतील एका युवा गायिकेने गेल्या ७५ दिवसांच्या कालावधीत ७५ देशभक्तीपर, स्फूर्ति गिते गाऊन एक कौतुकास्पद उपक्रम पार पाडला. २ जून पासून सुरू असलेल्या या उपक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्रासह देश-विदेशातील भारतीय नागरिक या कार्यक्रमाचा ऑनलाईन प्रणालीतून दररोज लाभ घेत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय केंद्र, राज्य सरकारने जाहीर केला. या उपक्रमात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून डोंबिवलीतील युवा गायिका यशश्री मिलिंद करंदीकर हिने आपणही ७५ दिवसात ७५ राष्ट्रभक्तीपर गिते गाऊन एक अनोखा उपक्रम पार पाडू असा निर्धार केला. १५ ऑगस्टपर्यंत ७५ गाणी गाऊन पूर्ण होणे आवश्यक असल्याने यशश्रीने २ जून पासून घरातूनच नियमित ऑनलाईन प्रणालीतून देशभक्ती, स्फर्तिगीते गाण्यास सादर करण्यास सुरुवात केली. दररोज ५० हजाराहून अधिक रसिक ही गाणी ऐकत होते.
दिग्गज कवींनी रचलेली, गायकांनी गायलेल्या गाण्यांचा यामध्ये समावेश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रभक्तीपर गाणी यावेळी सादर करण्यात आली. शाळांमध्ये २६ जानेवारी, १५ ऑगस्टला विद्यार्थी प्रभातफेरीच्या वेळी गात असलेल्या गितांचा गाण्यांमध्ये समावेश होता. रचलेली पण कधी कोणाच्या ऐकीवात नसलेल्या गाण्यांचे सादरीकरण यशश्री करंदीकर हिने केले.

भारत ये रहना चाहिये, मेरा जान तिरंगा है, मेरा रंग दे बसंती चोला, तेरी मिट्टी, बलसागर भरत होओ, हम होंगे कामयाब, ए मेरे वतन के लोगो, अशा प्रकारची देशभक्तीपर गिते गाऊन यशश्रीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सोमवार, १५ ऑगस्टचे निमित्त साधून यशश्रीने आनंदमठ चित्रपटातील संपूर्ण वंदे मातरम गाऊन ७५ दिवस चाललेल्या गानयज्ञाची समाप्ती केली.

७५० गाण्यांचे गायन
मार्च २०२० मध्ये करोना महासाथीच्या काळात अचानक टाळेबंदी लागू झाली. जनजीवन ठप्प झाले. अशावेळी घरात कोंडून बसलेल्या नागरिकांना एक मनोरंजनाचे साधन म्हणून यशश्रीने टाळेबंदीच्या काळात रोज एक गाणे गाऊन अशी २०० गाणी गायली. महासाथीच्या दोन वर्षात तिच्या या उपक्रमाला महाराष्ट्रासह देश-विदेशातून चांगला प्रतिसाद मिळाला. गाण्यांचा दररोज पहाटे रियाज करायचा आणि त्यानंतर गाणी सादर करायचे ही यशश्रीची सादरीकरणाची पध्दत आहे. गेल्या अडिच वर्षाच्या काळात यशश्रीने आतापर्यंत ८०० विविध प्रकारची गाणी गायली आहेत. ऑनलाईन प्रणालीतून लाखो चाहत्यांनी या गाण्यांचा स्वाद घेतला आहे. भावगीते, भक्तिगीते, भजन, अभंग, गझल,नाट्यगीते, बालगीते अशा गितांचा यामध्ये समावेश आहे.
यशश्रीच्या घरात गाणे आहे. आई, वडीलांना गाण्याचा गळा आहे. शालेय जीवनपासून यशश्री गाते. संगीत विषयातून सर्वोत्तम श्रेणीत यशश्रीने पदवी प्राप्त केली आहे. विद्याधर गोखले नाट्य संगीत प्रतिष्ठानचा पदविक संगीत अभ्यासक्रम तिने पूर्ण केला आहे. स्मिता बने, मंदार गानू, उदय चितळे, शुभदा पावगी, अपर्णा हेगडे, माधवी घारपुरे यांच्याकडे तिने गायनाचे धडे घेतले आहेत.

संस्कार भारती कल्याण जिल्ह्यातर्फे डोंबिवलीत सर्वेश सभागृहात सोमवारी पहाटे आयोजित पंचाहत्तरी स्वातंत्र्याची गाण्यांच्या कार्यक्रमात यशस्वीचा सहभाग होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An initiative of a young singer from dombivli singing 75 patriotic songs in 75 days amy
First published on: 15-08-2022 at 15:55 IST