डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीतील निवासी वसाहतीमधील मध्यवर्ति ठिकाणी असलेले कल्याण डोंबिवली पालिकेचे आनंद दिघे उद्यान गेल्या महिन्यापासून बंद असल्याने पालक, मुले, ज्येष्ठ नागरिक, वृध्द नाराजी व्यक्त करत आहेत. आत्ता सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे. सकाळ, संध्याकाळ उद्यान, मैदानात मौजमजा करायला मिळावी म्हणून मुले उत्सुक असतात. अशा परिस्थितीत आनंद दिघे उद्यान पालिकेने लवकर सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून या उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या उद्यानात मुलांसाठी मनोरंजनाची साधने, चालण्यासाठी पदपथ, हिरवाई, मोकळी व्यायामशाळा, बाकडे अशा अनेक सुविधा आहेत. पहाटे पाच ते सकाळी १० आणि संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे उद्यान पालिकेकडून खुले असते. डोंबिवली एमआयडीसीतील नागरिक पहाटेपासून या उद्यानात चालण्यासाठी, व्यायामासाठी येतात. महिला, पुरूष, तरूण, तरूणी यांचा यात समावेश असतो.
संध्याकाळी चार नंतर या उद्यानात नागरिकांची गर्दी असते. ठेकेदाराच्या नियंत्रणाखाली या उद्यानाची देखभाल केली जाते. गेल्या महिन्यापूर्वी उद्यानांची देखभाल करणाऱ्या सुरक्षा एजन्सीचा पालिकेबरोबरच्या ठेक्याची मुदत संपली आहे. त्यामुळे नवीन ठेका देणे आणि सुरक्षा रक्षक तैनात होईपर्यंत संबंधित एजन्सीचे सुरक्षा तैनात असलेली उद्याने बंद ठेवण्याची वेळ ठेकेदारांवर आली आहे. या यादीत आनंद दिघे उद्यानाचा समावेश आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाल्याने पालिकेने सुरक्षा व्यवस्थेची तात्पुरती व्यवस्था करून हे उद्यान सुरू करावे म्हणून माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख सागर पाटील यांनी पालिकेकडे हे उद्यान सुरू करण्यासाठी तगादा लावला आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने काही दिवस विश्वसनीय एका व्यक्तिकडे पहाटे उद्यान उघडणे आणि बंद करण्याची जबाबदारी सोपवली होती. पण हा प्रकार नंतर थांबला.
आनंद दिघे उद्यानात व्यायामाची साधने, शोभीवंत झाडे झुडपे आहेत. त्यांची नासधूस होऊ नये म्हणून या उद्यानाची चावी अनोळखी व्यक्तीकडे दिली जात नाही. तसेच, एमआयडीसी परिसरातील अनेक प्रेमीयुगले या उद्यानाच्या आसपास फिरत असतात. उद्यान सुरक्षा रक्षकाविना खुले ठेवले तर याठिकाणी काही गैरप्रकार होण्याची भीती आहे. त्यामुळे पालिकेकडून सुरक्षा रक्षकाविना हे उद्यान सुरू करण्याची जोखीम घेतली जात नसल्याचे समजते.उद्यान विभागाने पालिका सुरक्षा विभागाला पत्र देऊन आनंद दिघे उद्यानात तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यासाठीचा पत्रव्यवहार केला आहे.
एमआयडीसीतील आनंद दिघे उद्यानाची सुरक्षा व्यवस्था बघणाऱ्या एजन्सीचा करार संपला आहे. नवीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उद्यानाला सुरक्षा नसेल म्हणून उद्यान बंद आहे. उद्यानात गैरप्रकार नकोत म्हणून उद्यान अन्य कोणा व्यक्तिवर विश्वास ठेऊन चालू ठेवण्याची जोखीम प्रशासन घेत नाही. पालिका सुरक्षा व्यवस्थेच्या माध्यमातून उद्यान सुरू ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. – महेश देशपांडेउद्यान अधीक्षक, डोंबिवली.