डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत चार सदस्य प्रभाग पध्दतीत आपणास उमेदवारी मिळत नाही हे निदर्शनास आल्यावर अस्वस्थ झालेल्या शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक दिवंगत वामन सखाराम म्हात्रे यांचा मुलगा अनमोल म्हात्रे, त्यांची पत्नी अश्विनी, शिवदूत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी मराठा मंदिर सभागृहात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रवेशामुळे मागील २७ वर्ष वामन म्हात्रे यांनी शिवसेनेचा प्रभाग म्हणून भक्कमपणे बांधून ठेवलेल्या महाराष्ट्रनगर, प्रसाद सोसायटी प्रभागात उभी फूट पडली आहे. मागील २८ वर्ष वामन म्हात्रे यांनी शिवसेनेतून या प्रभागावर आपली भक्कम मांड ठेवली होती. महिला, पुरूष कार्यकर्त्यांची एक तगडी फळी त्यांनी प्रभागात उभी केली होती. प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या कुटुंबाचा सदस्य या भावनेतून वामन म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी वागणूक दिली. या तगड्या कार्यकर्त्यांच्या बळावर वामन म्हात्रे यांनी अनभिषिक्तपणे आपल्या प्रभागांवर आपले वर्चस्व अबाधित ठेवले.

अनेक राजकीय शक्तिंनी त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. तो कधीच यशस्वी झाला नाही. शिवसेनेत असले तरी वामन म्हात्रे यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर अतिशय निकटचे ऋणानुबंध होते. शिवसेनेत राहून ते विधानसभा निवडणुकीत भाजपचे चव्हाण यांच्या विजयासाठी सुप्तपणे आपली ताकद लावायचे. पालिकेत भाजपच्या एका नगरसेवकाला स्थायी समिती सभापती करण्यात शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी भाजपच्या बाजुने मतदान करून मोलाची मदत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना केली होती.

वामन म्हात्रे यांची भांडुप येथील विवाहित मुलगी भाजपच्या जागृती पाटील-म्हात्रे यांना मुंबई पालिकेत नगरसेविका म्हणून विजयी करून देण्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. या सर्व घरोब्याच्या राजकारणातून आपल्या वडिलांनी केलेली राजकीय वाटचाल आणि स्नेहसंबंध विचारात घेऊन आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर घरातून साथ मिळण्याची शक्यता कमी आणि एकाकी पडण्याची वेळ आली तेव्हा वामन म्हात्रे यांचा मुलगा अनमोल म्हात्रे, स्नुषा अश्विनी म्हात्रे यांच्यासह शिवदूत संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, माजी मंडल पश्चिम अध्यक्ष समीर चिटणीस, माजी नगरसेवक जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, हदयनाथ भोईर, मुंबई पालिकेच्या माजी नगरसेविका जागृती पाटील-म्हात्रे यांच्या उपस्थितीत अनमोल म्हात्रे, अश्विनी म्हात्रे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘वामन म्हात्रे शिवसेनेत होते. पण त्यांचे आपल्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.

कोणत्याही अडचणीच्यावेळी त्यांची आवर्जून मोलाची साथ असायची. शिवसेनेत आहोत मग भाजपच्या चव्हाण यांंना का मदत करायची असा विचार कधीच त्यांनी केला नाही. या सगळ्या जुन्या वाटचाल, ऋणानुबंधातूनच त्यांचा मुलगा अनमोल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असे वाटते. पालिकेत पारदर्शक कारभार करण्यासाठी भाजपशिवाय पर्यायी नाही. त्यामुळे आपण सर्व मिळून एकत्रितपणे काम करून आपले लक्ष्य साध्य करू, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.