डोंबिवली : कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण, डोंबिवली शहरे नशामुक्त करण्याचे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत मागील दोन दिवसात उपायुक्तांच्या नियंत्रणाखालील विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंबिवली शहराच्या विविध भागात कारवाई करून तीन गांजा तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख रूपये किमतीचा ३० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ चव्हाण आणि पथक, रामनगर पोलीस डोंबिवलीत आयरे गाव, लक्ष्मण रेषा इमारत परिसरात खासगी वाहनातून गस्त घालत होते. त्यांना रेल्वे मार्गाजवळ एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळला. पोलिसांना पाहून तो रेल्वे मार्गाच्या बाजुने पळू लागला. पथकाने त्याला पकडले. किरण शहा (४०) असे त्यांचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर मधील रहिवासी आहेत. पोलिसांनी जवळून आठ किलो वजनाचा दीड लाख रूपये किमतीचा गांजा जप्त केला. रामनगर पोलीस ठाण्यात किरण शहा यांच्या विरुध्द अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण शहा यांच्यावर मध्यप्रदेशमध्ये गांजा तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात उपनिरीक्षक पंढरीनाथ चव्हाण ठाकुर्ली चोळेगाव भागात गस्त घालत होते. चोळेगाव तलाव भागात दोन इसम संशयास्पदरीत्या हालचाली करत होत्या. पोलिसांनी त्यांना अडवून विचारणा केल्याबरोबर त्यांची घाबरगुंडी वळली. सचिन मोरे (२१), संजु लुहार (२४) अशी इसमांची नावे आहेत. त्यांच्या जवळ २३ किलो गांजा आढळला. या गांजाची बाजारातील किंमत चार लाख ५७ हजार रूपये आहे. हे दोघे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत.

दारु अड्डा सुरूच

डोंबिवलीत देवीचापाडा हनुमान मंदिरमागे आणि भोईर सदनच्या बाजुला मच्छिद्र चिमण पाटील नकली विदेश दारूची बेकायदा विक्री करत आहेत. या मद्य विक्रीचा परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. याठिकाणी मद्यपींची चोवीस तास वर्दळ असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. उपायुक्त झेंडे यांनी विशेष पथक पाठवून हा अड्डा उध्दवस्त व चालकावर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांची तस्करी, गांजा सेवन करणाऱ्यांच्या विरोधात कल्याण, डोंबिवलीत कारवाई सुरू आहे. ही कारवाई सुरू असताना मध्यप्रदेशातून तीन जण रेल्वेतून प्रवास करत गांजाची तस्करी करत असल्याचे डोंबिवलीत आढळले. त्यांना अटक केली आहे. मध्यप्रदेशात डोंबिवलीतून कोण गांजाची मागणी नोंदवत आहेत. त्यांचे इतर किरकोळ विक्रेते कोण या दिशेने तपास सुरू आहे. अतुल झेंडे पोलीस उपायुक्त, कल्याण.