बदलापूरः  बदलापूर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये अंबरनाथहून प्रवासी आधीच बसून येत असल्याने वाद होऊ लागलेत. या वादाची एक चित्रफीत नुकतीच समोर आली आहे. बदलापूर स्थानकात आधीच सर्व लोकल गाड्या तुडूंब भरून जातात. त्यात स्थानकातून सुटणाऱ्या लोकल आधीच भरून येत असल्याने प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या लोकलमध्ये अंबरनाथचे प्रवासी आधी चढून जागा बळकावून ठेवतात. त्यामुळे बदलापूरहून चढलेल्या प्रवाशांना आपल्या हक्काच्या लोकलमध्ये सुद्धा जागा मिळत नाही. परिणामी प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो. 

या उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांविरोधात बदलापूरकर प्रवाशांनी संताप व्यक्त केला जातो आहे. यातूनच आता लोकलमध्ये वाद होऊ लागले असून या वादाची एक चित्रफीत नुकतीच समाज माध्यमांवर प्रसारीत झाली. सकाळी ९ वाजून २९ मिनिटांच्या बदलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकलमध्ये हा वाद झाला. यात अंबरनाथहून बसून आलेल्या प्रवाशांची मग्रुरी दिसून आली. यानंतर आता रेल्वे पोलीस आणि प्रशासनाने उलटे बसून येणाऱ्या या प्रवाशांवर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा एकदा स्टेशन मास्तरांना घेराव घालू, असा इशारा रेल्वे प्रवाशांनी दिला आहे.