होली ट्रिनिटी चर्च, गोम्सआळी
निर्मळ येथील पवित्र क्रुसाचे चर्च म्हणजे त्या सभोवतालच्या पंचक्रोशीचा एक केंद्रबिंदू. त्या एका चर्चपासून अन्य चार चर्च तयार झाली. त्यातील एक चर्च म्हणजे गोम्सआळी येथील ‘पवित्र त्रक्याचे चर्च.’
इंग्रजी भाषेमध्ये अशी एक म्हण आहे की, ‘जे देवळाला जवळ ते देवापासून दूर आणि जे देवळापासून दूर ते देवाला जवळ.’ वंडा आणि गोमपाडा या दोन आळ्या निर्मळ देवळापासून दूर, पण या दोन आळ्यांतील लोक मात्र पिढय़ान्पिढय़ा दर रविवारी पहाटेच्या अंधारात हातात कंदील घेऊन शेताच्या कांडय़ावरून निर्मळ चर्चपर्यंत पायी जात. निर्मळ चर्चच्या डोंगरीवरून रविवारी सकाळी शेतातून दिसणारी ही दिव्याची आरास मनोहारी वाटायची. या भाविकांच्या अंत:करणात ज्या भक्तीच्या ज्योती होत्या, त्याचेच जणू ते प्रतीक. देवा-देवळाच्या या विलक्षण ओढीपोटी त्यांच्या गावात चर्च असणे हे गरजेचे होते. परंतु देण्या-घेण्याच्या बाबतीत अल्प भूधारक शेतकऱ्यांचे हात तोकडे असल्याने स्वत:च्या गावात त्यांना चर्च उभारणे शक्य झाले नव्हते. सुदैवाने निर्मळ येथील त्यांच्या मुख्य चर्चच्या अधिकारपदावर आले फादर डॉ. एलायस रोड्रिंक्स यांनी गोमपाडा या विभागातील लोकांची आध्यात्मिक गरज वेळीच जाणली आणि गावाच्या वेशीवरच एक चर्च उभे करण्याचा मनसुबा लोकांपुढे व्यक्त केला. लोकांना तेच नेमके हवे होते. फादर यांना अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळू लागला. कुणी जागेच्या रूपाने, कुणी पैशाच्या रूपाने तर कुणी एखादी वस्तू दान करण्याच्या निमित्ताने फादर यांच्या गाठीभेटी घेऊ लागले. जागेचा प्रश्न सुटणे एरवी सोपे नसते, इथेही ते सोपे नव्हते. परंतु लोकांचा उत्साह एवढा प्रचंड की, हातोहात एकेक प्रश्न सुटू लागले आणि चर्चसाठी लागणारा भला मोठा भूखंड स्थानिक शेतकऱ्यांनीच उपलब्ध करून दिला.
डॉ. एलायस रोड्रिंक्स हे एक प्रज्ञावंत व ज्ञानवंत धर्मगुरू. ‘बायबलचा मराठी अवतार’ यावर त्यांनी विद्यार्थिदशेतच पीएचडी पूर्ण केली. त्यांच्या अंत:करणात देव या त्रक्याविषयी विशेष प्रेम होते. हे चर्च बांधताना ते या त्रक्याला वाहिलेले असावे, असा मुद्दा त्यांनी लोकांपुढे आग्रहाने मांडला आणि लोकांनी तो उचलून धरला. त्यानंतर हे चर्च उभे राहिले आणि त्याचा उद्घाटन सोहळा २६ मे २००२ मध्ये झाला. गावात चर्च उभे राहिल्यानंतर एका दुर्लक्षित विभागाला ख्रिस्त सभेच्या नकाशावर एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले. गोमपाडा हे जुन्या वळणाचे नाव जाऊन त्याऐवजी गोम्सआळी हे नवीन नाव प्रचलित झाले. धार्मिकदृष्टय़ा या गावाला एक आगळ्यावेगळ्या कैवारीची देणगी मिळाली. त्याचप्रमाणे गावाला नव्या नावाचेही वरदान प्राप्त झाले. आज गोम्सआळी जरी मूळच्या ठिकाणी असली तरी ते चर्च लोकांच्या हृदयात एक मानाचे स्थान मिळवून आहे. या चर्चच्या अवतीभोवती बारा महिने हिरवळच हिरवळ दिसून येते. पावसाळ्यात भाताच्या पिकाचा हिरवा गार गालिचा तर थंडीच्या व उन्हाळाच्या दिवसात वाल, पापडी, चवळी, कांदे व वांगी या बागायती पिकांचा भरपूर सडा पडलेला असतो.