संध्याकाळची गर्दी कमी झाली. शेवटचा भेळवालाही काठावर थाटलेले दुकान आवरून चालता झाला आणि ‘आणखी एक दिवस गेला..’, असे म्हणत उपवन तलावाने दीर्घ नि:श्वास टाकला. आता किमान चार-पाच तास तरी तिकडे कुणी फिरकणार नव्हते. पूर्वी अशा रम्य रात्री आकाशातल्या चांदण्यांचे प्रतिबिंब आपल्या पृष्ठभागावर  मिरवीत तलाव त्यांच्याशी गुजगोष्टी करायचा. सोडीअम व्हेम्परचे दिवे आले आणि तलावांचा चांदण्यांशी होणारा संवाद बंद झाला. जलचर होते, तेव्हाची गोष्ट तर आणखी वेगळी होती. एका भरल्या कुटुंबातील प्रमुखासारखा उपवन तलावाचा रुबाब होता. लहान-मोठे, निरनिराळ्या जातींचे रंगीबेरंगी मासे, साप ते अगदी मगरींच्या वास्तव्यामुळे उपवनच्या श्रीमंतीचा ठाण्यातील इतर तलाव हेवा करीत होते. मात्र काळानुरूप ठाणे शहराचे रूप बदलले आणि तलावांचे पाणीही. जिथे मगरींचा निभाव लागला नाही तिथे मग मासे कसे टिकतील?
आताशा उपवन तलावास एकटेपणा सोसवत नाही. कारण कुणी सोबत नसले की त्याचे मन नकळतपणे भूतकाळात डोकावते. त्याचा त्याला त्रास होतो. आपण काय होतो आणि आता काय झालो या विचाराने त्याचा जीव कासावीस होतो. आपले पूर्वीचे संथ, निळे रूप आठवून त्याला गलबलून येते. आताच्या काळपट, हिरवट चेहऱ्याची त्याला लाज वाटते. मात्र हे काही त्याच्या एकटय़ाचे दु:ख नाही. शहरातील सर्वच तलावांच्या नशिबी थोडय़ा फार फरकाने हेच भोग आहेत,  याची त्याला जाणीव आहे. आपण टिकलो तरी, मात्र काही होत्याचे नव्हते झाले. अगदी नामशेष झाले, हेही त्याला माहिती आहे. संवर्धन, सुशोभीकरणाच्या औषधांनी तलावांचे दुखणे दूर करण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासन करीत आहे. मात्र त्या तात्पुरत्या आणि दिखावू मलमपट्टय़ा आहेत.  
गेली काही वर्षे उपवनला आपणही एकेदिवशी नामशेष तर होणार नाही ना याची भीती वाटू लागली आहे. कारण उन्हाळ्याच्या अखेरीला त्याचा तळ कोरडा पडू लागला आहे. आपण आता मासुंद्यासारखे बारमाही नाही, या विचाराने तो खचू लागला आहे. घर फिरले की घराचे वासेही फिरतात, तसे पात्रातील जीव नाहीसे झाल्यावर उपवन तलाव अखंड वाहता ठेवणाऱ्या झऱ्यांनीही हात आखडता घेतला आहे. कशामुळे झाले असेल बरे हे ? उपवनला कधी कधी प्रश्न पडतो आणि नकळत त्याचे मन मासुंदा तलावाशी तुलना करू लागते. कारण तसे ते दोघे समवयस्क. फक्त मोक्याच्या जागेवर असल्याने पाहिल्यापासून मासुंदाने भाव खाल्ला. आता त्याचीही रया गेली असली तरी किमान पाऊस पडेपर्यंत त्यात पाणी तर टिकते. मग आपणच का कोरडे पडू लागलो ? त्याला शेजारच्या टोलेंजंग इमारतींवर संशय आहे. इमारतींच्या जलसंधारण योजनांनी आपल्या झऱ्यांना फितविले, अन्यथा पाण्यासाठी आपल्याला पावसाची वाट पहावी लागली नसती, यावर त्याचा ठाम विश्वास आहे.
या दुष्काळात तेरावा महिना ठरावा तसे गेल्या वर्षी झाले. ठाणे शहराचा कला महोत्सव उपवन तलावाकाठी आणि तोही त्याच्या नावाने साजरा झाला. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.  होळी-गणपतीला शहरातले गणगोत जमा होऊन गावचे एरवी सुने असणारे घर गजबजून जावे, असे उपवन तलावाचे झाले. तो हरखून गेला. आता किमान वर्षांतून एकदा तरी हा आनंद उपभोगता येईल, या आशेवर तो पुढच्या जानेवारीची वाट पाहू लागला. मात्र यंदाच्या जानेवारीत तसे काही घडलेच नाही.  तो कलेचा महोत्सव म्हणजे ऋण काढून सण साजरा करण्याचा प्रकार होता, तेव्हापासून तर तो खूपच अस्वस्थ आहे. आपल्या नावामागे असा कर्जबाजारीपणाचा, बदनामीचा डाग लागला, या चिंतेने तो दिवसेंदिवस अधिकाधिक आटू लागला.      
 महादेव श्रीस्थानकर