२ जानेवारी १९९६ला ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्या हस्ते आणि नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत बाल कवयित्री मनस्विनी लता रवींद्र हिच्या ‘आभाळाचे गाणे’ काव्यसंग्रह प्रकाशनाचा कार्यक्रम तुडुंब गर्दीत संपन्न झाला. हा कार्यक्रम जिज्ञासा ट्रस्टच्या शालेय जिज्ञासा या मुलांचा, मुलांनी, मुलांसाठी प्रकाशित होत असलेल्या नियतकालिकातर्फे आयोजित केलेला होता. कार्यक्रमाची सूत्रे शालेय जिज्ञासा संपादक मंडळाकडे म्हणजेच पर्यायाने विद्यार्थ्यांकडे होती. कार्यक्रम संपल्यावर वेळ आली होती ती कार्यक्रमाचा वृत्तांत वृत्तपत्रांकडे पाठवण्याची. कार्यक्रमाचे स्वरूप बघता ही बातमी दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध होणे आवश्यक होती. ही जबाबदारी अंगावर घेतली ती नुकतीच जिज्ञासा संपादक मंडळात सहभागी झालेली सरस्वती सेकंडरी स्कूलच्या आठवीच्या विद्यार्थिनीने. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांत या कार्यक्रमाचा वृत्तांत छापून आला. त्याखाली नाव होते, अमृता नवरंगे, सह संपादक, शालेय जिज्ञासा.
आज अठरा वर्षांनी अमृता नवरंगे डॉ. अमृता नवरंगे -जोशी या नावाने ओळखली जाते. जिद्द-ज्ञान आणि साहस या त्रिसूत्रावर जिज्ञासाची उभारणी झाली असल्याने सहाजिकच इयत्ता ९वीमध्ये ‘शालेय जिज्ञासा’च्या संपादकाची जबाबदारी स्वीकारली, पण त्याअगोदर तिने मे महिन्यात जिज्ञासाचे हिमालयन साहस शिबीर ‘अ’ श्रेणी घेऊन पूर्ण केले होता.
१९९६-९७च्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत अमृताने सहभाग घेतला होता. ‘माझ्या स्वप्नातील भारत’ हा परिषदेचा मुख्य विषय होता. या मुख्य विषयाअंतर्गतच ‘चलता है नही चलेगा’ या उपविषयावर अमृताने संशोधन करायचे ठरवले. अमृता पोंक्षे, पल्लवी गलगले आणि पूनम शिंदे या तिच्या प्रकल्प सहकारी होत्या. बेशिस्त पद्धतीने नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर त्यांचा विषय होता. यासाठी त्यांनी ठाण्यातील कोपरी पूल ते टेलिफोन जंक्शन हा महात्मा गांधी रोडचा भाग निवडला. हा रस्ता निवडण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची शाळा सरस्वती सेकंडरी स्कूल याच रत्यावर होती. बेशिस्त आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा त्रास प्रामुख्याने शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना होत होता. त्या वेळपर्यंत ठाण्यातील वाहतुकीचा शास्त्रोक्त अभ्यास कोणीच केला नव्हता.
या गटाने प्रमम ४०० मीटर रस्त्यावर होणारी वाहतूक, वाहन प्रकार, वेळ, वाहनातील प्रवासी इत्यादी घटकांचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे पादचारी व फुटपाथची लांबी-रुंदी यांचीही नोंद झाली. त्याचप्रमाणे टेलिफोन जंक्शनवर सिग्नल तोडणाऱ्या वाहनांचीदेखील नोंद करण्यात आली. या रस्त्यावर सकाळी सात ते सायंकाळी सात या काळात बस व ट्रक यांना वाहतुकीस बंदी होती. तरी ही वाहने त्या वेळेत येथून ये-जा करत होती. त्या काळात हायवेवर फ्लायओव्हर व सíव्हस रोड नसल्याने वागळे इस्टेट व पोखरण येथील कंपन्याच्या बस वेळ वाचवण्यासाठी महात्मा गांधी रोडचा वापर करीत असत. अमृता आणि तिच्या सहकारी मत्रिणींनी या कंपनी बसची नोंद वाहतूक पोलिसांना दिली. संबंधित कंपनीना पत्र लिहूनसुद्धा परिस्थिती बदलत नाही हे लक्षात आल्यावर पोलिसांच्या परवानगीने त्यांनी कोपरी पुलावर सर्व वाहतूक अडवली व सर्व बस चालकांना उलट फिरून पूर्व द्रुतगतीचा वापर करण्यास भाग पाडले. ‘चलता हे नही चलेगाचे’ प्रत्यक्ष आचरण त्यांनी केले. त्यांच्या या कृतीची वृत्तपत्रातून कौतुक व प्रशंसा झाली. मुख्य म्हणजे वाहतूक पोलिसांना कोपरी पुलावर एक पोलीस वाहतूक नियंत्रणासाठी सकाळी सातपासून ठेवणे प्राप्त झाले. हे सर्व झाले ते बाल वैज्ञानिकांनी केलेल्या वाहतुकीच्या शास्तोक्त अभ्यासावर आधारित लिहलेल्या संशोधन प्रबंधामुळे.
शालान्त परीक्षा झाल्यावर तिच्या सहकारी मत्रिणींनी  इतर सर्वसाधारण हुशार विद्यार्थ्यांप्रमाणे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. मात्र, अमृतांनी मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करण्याचा एक निर्धार करून मुंबई शहरातील सेंट झेविअर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे पदार्थविज्ञान हा विषय घेऊन तिने बी.एस्सी. ऑनर्स ही पदवी मिळवली. या काळात महाविद्यालयातील प्रा. अजय पटवर्धन यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
तिने २००४मध्ये टाटा मूलभूत संशोधन केंद्रात क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा फ्रिजमध्ये होणारा वापर या प्रकल्पावर काम केले. २००७मध्ये तिला ओहायो राज्यातील टोलेडो विद्यापिठात इंटिग्रेटेड पीएच.डी.साठी प्रवेश मिळाला. याचे संशोधन करताना तिला प्रयोगशाळेत सौर सेलमध्ये उपयोगात येणाऱ्या पातळ फिल्मवर काम करण्याची संधी मिळाली. सौरघटक बनवताना तांबे वापरले जाते. त्यामुळे सौरसेलची क्षमता कमी होत जाते. या प्रक्रियेवर र्निबध घालण्यासाठी प्रयोगशाळेत संशोधनाअंतर्गत तिने ‘कॅडमियम टेल्युराइड’ या स्थिर पदार्थाचा वापर करून सौर सेलची क्षमता वाढवण्यावर भर दिला. पुढे पीएच.डी.च्या संशोधनासाठीही तिने पातळ फिल्मशी निगडित विषय निवडला. २०१२मध्ये भारतात परतल्यानंतर तिने मुंबई आय.आय.टी.मधील नॅशनल सेंटर फॉर फोटोव्होल्टिक रिसर्च अॅन्ड एज्युकेशनमध्ये साहाय्यक संशोधक पदावर काम केले. सध्या अमृता आबुधाबी येथील हॉटेल्समधील वाया जाणाऱ्या खाद्यतेलापासून बायो डिझेलनिर्मितीवर ती सध्या काम करीत आहे.
सुरेंद्र दिघे