ठाणे जिल्हा हा तसा तलावांचा जिल्हा. जिल्ह्यातील अनेक शहरांचे सौंदर्य वाढविले ते तलावांनी. ठाणे शहर असो वा कल्याण-डोंबिवली, येथील तलाव हे या शहरांची शान आहेत. कल्याणमधील ऐतिहासिक काळा तलाव तर या शहराचे ऐतिहासिक वैभव. अतिशय सुंदर, निसर्गरम्य असलेल्या या परिसरात फेरफटका मारणे एक वेगळाचा अनुभव देऊन जाते.
कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौकातून भिवंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजूला काळा तलाव आहे. कल्याण शहराच्या इतिहासात या शहराचे महत्त्व अनन्यसाधारण होते. काळा तलावच पूर्वी कल्याण शहराचा जलस्रोत होता. काळाच्या ओघात हा तलाव बकाल झालेला होता; परंतु महापालिकेने पाच वर्षांपूर्वी या तलावाचे सुशोभीकरण केले आणि या तलावासह हा परिसर नयनरम्य केला.
या तलावाचे नाव काळा तलाव का पडले याबाबत अधिक माहिती नाही. मात्र या तलावाच्या एका काठावर ‘काळी मशीद’ आहे. त्यावरून या तलावाला काळा तलाव असे नाव पडले असावे, असा तर्क आहे. या तलावाचे पूर्वीचे नाव शेनाळे तलाव असे होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे काळात कल्याण शहराला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारा हा तलाव म्हणजे शहराची ऐतिहासिक गाथाच. या तलावात मुबलक पाणी असल्याने ते पाणी भूमिगत पन्हळीद्वारे आजूबाजूच्या तलावांमध्ये सोडले जात असे. त्या वेळी कल्याण शहरात तब्बल दहा तलाव होते आणि त्यांना काळा तलावामधूनच पाणीपुरवठा केला जात असे. त्या काळी अगदी उन्हाळय़ातसुद्धा कल्याणमधील सर्व तलाव पाण्याने भरलेले असायचे.
शहराच्या मध्यभागी असलेला हा तलाव शहराचे आकर्षण असल्याने महापालिकेने त्याचे सुशोभीकरण केले आणि या तलावाभोवती फिरस्त्यांची गर्दी होऊ लागली. घटकाभर निवांत हवा असेल तर हा परिसर अतिशय रमणीय आहे. तलावातील पाच कारंजी लक्ष वेधून घेतात. अनेकदा रात्री तलावाभोवत रोषणाई केली जाते, त्या वेळी तलावाचे रमणीय रूप प्रकाशमान होते आणि आपले डोळेही उजळून निघतात. रोषणाई केल्यावर तलावातील थुई थुई नाचणारी कारंजी अतिशय सुंदर दिसतात. तलावाभोवती संरक्षक कठडा बांधण्यात आलेला असून, त्याच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक आहे. नुकतीच तलावाच्या एका बाजूला ‘ओपन जिम’ तयार करण्यात आल्याने तरुणांची आणि व्यायाम करणाऱ्यांची येथे सकाळ-संध्याकाळ गर्दी असते.
तलावाच्या एका बाजूला बगीचा असून, त्यात लहान मुलांसाठी खेळणी ठेवण्यात आलेली आहेत. या बागेत संध्याकाळी बच्चे कंपनीचा किलबिलाट असतो. तलावामध्ये क्रोंच, बगळे वा अन्य पक्षी येत असतात, त्यांचे निरीक्षण करणे वा त्यांचा खेळ पाहणे ही एक चांगली अनुभूती असते. तलावामध्ये बोटिंगचीही सोय आहे. गजबजलेल्या आयुष्यात घटकाभर निवांत मिळविण्यासाठी काळा तलावासारखे दुसरे स्थान नाही.

काळा तलाव, कल्याण<br />कसे जाल?
’ कल्याण स्थानकाजवळून काळा तलाव येथे जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. स्थानकाहून चालत-चालत गेलात, तर १५ ते २० मिनिटांत काळा तलाव लागतो.

– संदीप नलावडे