विश्वास पाटील यांची भावना
लेखकाच्या पोतडीत सोन्याच्या लडी असून चालत नाही. त्यासाठी कलाकुसर लेखकाच्या पेनामध्ये असायला हवी, असा नारायण सुर्वेचा आशीर्वाद होता. त्यामुळे लिखाणाला बळ मिळाले, असे मत प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी जवाहर वाचनालयात व्यक्त केले. जवाहर वाचनालयाच्या सुवर्णपूर्ती कार्यक्रमाचे औचित्य साधून पानिपतकार विश्वास पाटील यांच्या लस्ट फॉर लालबाग या कादंबरीवर महाचर्चा आयोजित करण्यात आली होती.
लस्ट फॉर लालबाग या कादंबरीमध्ये संपूर्णपणे वास्तव लिहिलेले आहे. जिल्हाधिकारी झाल्यावर सर्व व्यवहार जवळून पाहता आले. चार ते साडेचार महिन्यांत लालबाग शहर पाहिले आहे. अडीच लाख गिरणी कामगार आणि दहा लाख लोक त्यांच्यावर अवलंबून आहेत. महानगरपालिका शाळेत जेवण नसलेली मुले चक्कर येऊन पडलेली आहेत. वाळूमध्ये तीन ते चार वर्षांचे मूल उघडे पडलेले आहे. या प्रकारचे निरीक्षण केले आणि हे वास्तव कादंबरीमध्ये लिहिणे आवश्यक होते. पहिल्यांदा प्रयत्न करून काही वास्तववादी आणि काही काल्पनिक पात्रे रेखाटली असे विश्वास पाटील यांनी कादंबरीविषयी बोलताना सांगितले. सह्य़ाद्रीजवळील नदीच्या काठावर फौजी आंबावडे या गावात प्रत्येक घरातील दोन माणसे गिरणी कामगार झालेली आहेत हे पाहता आले. मुंबईचे शांघाय आणि सिंगापूर करणे असे म्हणत चौदा हजार कोटींचे व्यवहार या मुंबईत झाले आहेत. मात्र यात नुकसान गोरगरिबांचे झालेले आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी गिरणी कामगार लढत होते, तेव्हा पोलिसांनी लालबागच्या चाळींमध्ये घुसून गोळीबार केला. कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्यासारख्या उत्तुंग प्रतिभेचा नेता कुठल्याच शहरात जन्माला आला नाही. मलबार हिलचे विस्ताभिरूप परळ लालबागमध्ये झालेले आहे. लाकडी बंदर मलबार हिलच्या जागेवर होते. हे सर्व होत जाणारे बदल जागतिकीकरणाची फळे आहेत. या वास्तवाचे दर्शन घडवून आणण्यासाठी कादंबरीचा घाट घाटला असे विश्वास पाटील यांनी सांगितले. या महाचर्चेत अशोक बागवे, वासंती वर्तक, नरेंद्र बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.