डोंबिवलीत एमआयडीसीतील निवासी विभागातील काँक्रिटीची रस्ते कामे सुरू करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जुलै मध्ये मुंबई सांताक्रुझ येथील मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीला कामाचे आदेश दिले आहेत. तीन महिने उलटुनही ठेकेदाराकडून रस्ते कामे सुरू करण्यात येत नसल्याने मनसेचे कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद पाटील यांनी फलकबाजीमधून शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली : बालिकेच्या मदतीने भिक्षा मागून गुजराण करणाऱ्या आजी-आजोबांना अटक

डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील काँक्रिटची रस्ते कामे सुरू करण्यासाठी मुहूर्त शोधायचा आहे. यासाठी ज्योतिष नेमण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. रस्ते कामाचा मुहूर्त मिळाल्याशिवाय मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन कडून काम सुरू करण्यात येत नसल्याने आता ज्योतिषाचा शोध घेऊन मुहूर्त काढून मग ही कामे ठेकेदाराने त्या तारखेला सुरू करावीत म्हणून गळ घालण्यात येणार आहे, अशा आशयाचे फलक डोंबिवली एमआयडीसीत वर्दळीच्या रस्त्यावर मनसेचे आ. प्रमोद पाटील यांनी लावले आहेत.

या फलकबाजीतून आ. पाटील यांनी नामोल्लेख न करता शिवसेना खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले आहे. एमआयडीसीतील रस्ते कामांसाठी ११० कोटीचा निधी एमआयडीसी, एमएमआरडीएकडून मंजूर करुन आणल्यानंतर आता एमआयडीसीतील रस्ते मार्गी लागणार म्हणून गेल्या वर्षी खा. शिंदे यांनी फलकबाजी केली होती. या फलकबाजी नंतर काही महिने उलटुनही रस्ते कामे सुरू होत नसल्याने आता रस्ते कामे कधी सुरू होणार अशी टीका करणारे उपरोधिक फलक आ. पाटील यांनी एमआयडीसीत लावले होते. खा. डाॅ. शिंदे यांच्याकडूनही आ. पाटील यांना ‘आम्ही पत्रकबाजी न करता प्रत्यक्ष कृतीमधून काम करुन दाखवितो.’ अशा आशयाचे फलक झळकवून मनसेच्या टिकेला उत्तर दिले होते.

हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानक भागात सॅटिस प्रकल्प राबवा ; शिवसेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

फेब्रुवारीत भूमिपूजन
ही फलकबाजी सुरू असताना १७ फेब्रुवारी रोजी एमआयडीसीतील रस्त्यांचे तत्कालीन पर्यावरण मंत्री युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपुजन झाले होते. ‘ही कामे आता गतिमानतेने होतील. कारण भूमिपुजन कामासाठी टिकाव, फावडाची गरज असताना खा. डाॅ. शिंदे यांनी या कामासाठी टिकाव, फावड्या बरोबर जेसीबी, इतर अत्याधुनिक यंत्रणा पण सज्ज ठेवली आहे. त्यामुळे ही कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होतील आणि या रस्ते कामांवरुन टीका करणारे मनसेचे आ. प्रमोद पाटील यांना आमच्या (शिवसेना) कौतुकाचे फलक लावावे लागतील,’ असा टोला भूमिपुजन कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. पाटील यांना लगावला होता. त्यावेळी बाजुलाच बसलेल्या आ. पाटील यांनी ‘तुम्ही फक्त रस्ते चकाचक करा, आम्ही पक्षीय भेद न ठेवता तुमच्याही अभिनंदनाचे फलक लावतो,’ असे प्रत्युत्तर आ. पाटील यांनी दिले होते. त्यानंतर दोन महिने उलटुनही रस्ते कामे सुरू न झाल्याने पुन्हा आ. पाटील यांनी फलकबाजी केली होती. या फलकबाजी नंतर अंबरनाथच्या ठेकेदाराने दोन महिन्याच्या कालावधीत एमआयडीसीत फक्त २०० मीटर काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामावरुन मनसेने टीका केली होती. खास ठेकेदाराना ही कामे देण्यात आल्याने ते मनमानीने काम करत असल्याची टीका बांधकाम क्षेत्रातील टीकाकार करत आहेत.

हेही वाचा >>> Video: उलटी करण्यासाठी रुळाजवळ गेला अन्…; AC लोकलच्या धडकेत मुंब्रा स्थानकात तरुणाचा दुर्देवी अंत, पाहा CCTV फुटेज

निवास रस्ते दुर्दशा
भूमिपुजना नंतर आठ महिन्यांनी एमआयडीसी निवासी विभागातील काँक्रिट रस्त्यांची कामे सुरू होत आहेत. निवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करुन नागरिक, शाळा चालक, रुग्णालय चालक यांना दिलासा देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. निवासी भागातील रस्ते कामे सुरू करण्याचे आदेश जुलै मध्ये एमएमआरडीएकडून काढण्यात आले आहेत. ४८ कोटीची ही कामे आहेत. १८ महिन्यात ठेकेदाराला ही कामे पूर्ण करण्याचे महामंडळाने ठेकेदाराला आदेशित केले आहे. दोन महिने उलटुनही ठेकेदार काम सुरू करत नसल्याने मनसेने शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले आहे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As the road work has not started in dombivli pramod patil has targeted the shiv sena by raising a banner amy
First published on: 23-09-2022 at 14:30 IST