एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी मर्यादेपलीकडे तिचा कंटाळा येत असतो. सर्वच क्षेत्रांत हा नियम लागू पडतो. आपण रोज एकाच प्रकारचे कपडे घालत नाही. संगीत कितीही आवडत असले तरी रोज रोज तीच गाणी ऐकत नाही. खाण्याच्या बाबतीत तर या वास्तवाची आपल्याला वारंवार प्रकर्षांने आठवण होत असते. सुदैवाने भारतातील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आता आपल्या अवतीभोवती सहज उपलब्ध झाले आहेत. ठाण्यातील आशापुरा स्नॅक्स कॉर्नर त्यापैकी एक. इथे महाराष्ट्रीय ओळख असलेली पुरणपोळी, मिसळपाव मिळतोच, त्याशिवाय इडली, डोसा, मसाला डोसा हे दाक्षिणात्य पदार्थ, पावभाजी आदी जिन्नसही मिळतात.
‘चवीचे खाणार त्यांना आशापुरा देणार’ या बोधवाक्यानुसार अडीच वर्षांपूर्वी मोहन पाटील यांनी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात चवदार खाद्यपदार्थ देता यावेत म्हणून आशापुरा स्नॅक्स कॉर्नर सुरूकेले. येथे सुरुवातीला फक्त डोसाच बनविला जात होता. त्यानंतर कालांतराने खवय्यांचा कल लक्षात घेऊन कांदेपोहे, वडापाव, सँडविच यांसारखे पदार्थ सुरू करण्यात आले. या कॉर्नरमध्ये आपणास डोसा, पुरणपोळी, उपमा यांसारख्या ३८ वैविध्यपूर्ण पदार्थाची चव चाखायला मिळते. तव्यावर साधा डोसा तयार करून त्यावर साजूक तूप लावले जाते. तूप लावल्यानंतर बटाटा, फ्लॉवर, सिमला मिरची यांची मिक्स भाजी, पांढरी, हिरवी, लाल चटणी आणि सांबर टाकून खमंग डोसा तयार केला जातो. हा डोसा बनवताना चीज टाकून आशापुरा स्पेशल डोसा तयार केला जातो. बटाटा भाजी, बटर, चीज याचे मिश्रण करून तयार केलेला म्हैसूर डोसा आणि उथप्पा, कांदा टाकून केलेला ओनियन उतप्पा, साधा डोसा, म्हैसूर उतप्पा, बटर डोसा यांचीही चव आपल्याला येथे चाखायला मिळते. विविध प्रकारच्या डोशांबरोबरच येथे इडली आणि मेदुवडाही मिळत असल्याने इडली डोसा आवडणाऱ्यांसाठी ही एक उत्तम साऊथ इंडियन मेजवानी ठरते.
डोसा आणि इडलीबरोबरच येथे असलेले कांदेपोहे, उपमा, मिसळपाव, वडापाव म्हणजे अस्सल मराठमोळ्या पदार्थाची मेजवानी. कढईमध्ये गरम तेलात हिंग-राईची फोडणी टाकून तयार केलेले लज्जतदार कांदेपोहे, आशापुरा कॉर्नरचे वैशिष्टय़ असलेले दुधात तयार केलेला उपमा किंवा घरगुती मसाला वापरून केलेली चमचमीत कोल्हापुरी मिसळ. त्यामुळे हे खाण्यासाठी ऑफिसमध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांची पावले येथे हमखास वळतात. याशिवाय सर्वाचे नेहमीचे आवडते खाद्य असलेला वडापाव किंवा मूग-वाटाण्याचा उसळीमध्ये वडा टाकून तयार केलेली वडा-उसळ म्हणजे सर्वासाठी एक प्रकारचे हलकेफुलके जेवणच.
अस्सल मराठमोळ्या आणि दाक्षिणात्य पदार्थाबरोबरच येथे आपल्याला नेहमीच्या परंतु सगळ्यांना आवडणाऱ्या पावभाजी आणि सँडविचची चवही चाखायला मिळते. बटाटय़ाची भाजी, काकडी, टोमॅटो, बीट, कांदा टाकून तयार केलेले मसाला सँडविच, नेहमीचे व्हेज प्लेन सँडविच, सँडविचवर चीज टाकून केलेले चीज मसाला सँडविच त्याचबरोबर ग्रिल सँडविच आणि चीज ग्रिल सँडविचही येथे उपलब्ध आहेत. सर्व भाज्यांचे मिश्रण करून तयार केलेली पावभाजी किंवा भाज्या उभ्या कापून स्मॅश न करता तयार केलेली खडा भाजी आणि त्याबरोबर तवापुलाव किंवा मिक्स तवा पुलाव म्हणजे तरुणाईसाठी एक प्रकारचे पोटभरीच जेवणच. सँडविच आणि पावभाजीबरोबर ब्रेड बटर आणि ब्रेड जॅम हा हलकाफुलका नाश्ताही येथे मिळतो.
आशापुरा कॉर्नरचे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारा चीजडोसा आणि पुरणपोळी. कॉर्नरमध्ये दररोज जरी आपल्याला पुरणपोळी मिळत नसली तरी घरगुती समारंभासाठी किंवा काही विशेष प्रसंगांसाठी ऑर्डर देऊन पुरणपोळी मागवता येते.
कुठे ?
आशापुरा स्नॅक्स कॉर्नर, मिनी स्टेडियमसमोर, नंदीबाबा चौक, गणेशनगर, ढोकाळी, ठाणे (प.).