डांबर वाहून गेल्याने रस्ता उंच-सखल, खड्डेमय; वाहनचालकांना अपघाताची भीती

ठाणे : मुंब्रा बावळण मार्गावरील पुलाचे डांबर पावसाळ्यात वाहून गेल्यामुळे हा पूल उंच-सखल आणि खड्डेमय झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतलेले नाही. त्यामुळे  हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

जेएनपीटी बंदर, मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बावळण मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने दोन वर्षांपूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. चार महिने दिवसरात्र सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी ४६ लाख ७५ हजार ५४० रुपये खर्च करण्यात आले होते. त्यासाठी ‘वॉटर प्रूफ मेमब्रेन्स’ हे तंत्रज्ञान वापरून पुलावर डांबरीकरण करण्यात आले होते. कोटय़वधी रुपये खर्चून दुरुस्ती केलेल्या पुलाची अवस्था अवघ्या दोन वर्षांत जैसे थे झाली आहे. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे या संपूर्ण पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पुलावरील डांबर वाहून गेल्याने बांधकामाच्या लोखंडी सळया उखडून वर आल्या आहेत. पुलाच्या खारेगावकडे येणाऱ्या दिशेला पडलेला खड्डा बुजवण्यासाठी सार्वजानिक बांधकाम विभागाने तब्बल दोन महिन्याचा वेळ घेतला. पुलाच्या उर्वरित कामाकडे विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुलाच्या डांबरीकरणाचे उर्वरित काम सार्वजानिक विभागाने अद्याप हाती घेतलेले नाही. डांबर वाहून गेल्यामुळे रस्ता उंच सखल झाला आहे. त्यामुळे हा पूल वाहनांसाठी अतिशय धोकादायक झाला असून या प्रकारामुळे पुलावर अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अंभियंत्यांसोबत संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

पथदिवेही बंद

मुंब्रा बावळण मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्याही वाढते. त्यामुळे रात्रीच्या वेळी या वळणावळणाच्या मार्गावर पथदिवे बसवण्यात आले आहेत. मात्र यातील बहुतांश पथदिवे सध्या बंद पडले आहेत. त्यामुळे या मार्गाचा भराचसा भाग अंधारात आहे.