Dahi handi utsav 2025 : ठाणे : मनसे नेते अविनाश जाधव यांनी शनिवारी ठाण्यातील भगवती शाळेच्या मैदानात मनसेच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी या शीर्षकाखाली हा उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी उपस्थिती लावताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. याच दरम्यान, विचारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे बंधूंच्या युतीबाबत भाष्य केले आहे.
शालेय शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करण्यासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) हे दोन्ही बंधू एकत्र आले होते. यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकूणच या सर्व घडामोडींमुळे आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. असे असतानाच, मनसे नेते अविनाश जाधव (Avinash jadhav) यांनी दहीहंडी कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सुचक विधान केले आहे. त्याचबरोबर राजन विचारे यांनीही युतीबाबत प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
राज्यावर भगवा झेंडा फडकणार
हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधून एकत्र आले आणि त्यानंतर काय घडले हे संपुर्ण राज्याने पाहिले. शेवटी सरकारला ही सक्ती मागे घ्यावी लागली. अध्यादेश रद्द करावा लागला. हीच खरी राज्याची ओळख आहे. राज्याच्या जनतेच्या मनामध्ये आहे की, ठाकरे ब्रँड हा किमया घडवू शकतो आणि तो किमया घडविणार, असे राजन विचारे म्हणाले. मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांची ध्येय धोरण एकच आहेत. दोन्ही नेत्यांचे रक्ताचं नातं आहे. त्यामुळे आमची मने जुळणार आणि राज्यावर भगवा झेंडा फडकणार, असे विचारे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलायला लाज वाटली पाहिजे, ते काय होते, हे सर्वांना माहित आहे. त्यांचा उदय कसा झाला, हेही सर्वांना माहित आहे. उदधव ठाकरे यांनी त्यांना इथपर्यंत आणून सोडले. त्यांना तिकीट दिले नसते तर त्यांचा उदय झाला असता का, त्यामुळे पाठीत खंजीर खुपसून ते भाष्य करतात, हे बरोबर नाही. जनता त्यांना जागा दाखवून देईल, असे विचारे म्हणाले.
यह फेविकॉल का जोड है
दोन्ही ठाकरे बंधून एकत्र आले आहेत. ‘ यह फेविकाॅल का जोड है, टुटेगा नही..’, राज्यात चांगले घडणार आहे. म्हणूनच दोघे बंधू एकत्र आले आहेत. जनतेच्या मनात जे आहे, ते साध्य होणार आहे. सर्वांचे स्वप्न आहे की, राज्यात मराठी माणसाचा आवाज घुमला पाहिजे, त्याची सुरूवात आता झाली आहे. मुंबई, ठाणे आणि इतर पालिकांवर भगवा झेंडा फडकेल. विरोधकांनी धसका घेतला आहे. ठाकरे हे ठाकरेच आहेत. दोघांचेही कर्तत्व आहे. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी स्वत:च्या कर्तत्वावर स्वत:चा पक्ष काढला. दुसऱ्याचा पक्ष फोडायला गेले नव्हते. ते समर्थपणे पक्षाची धुरा घेऊन राज्याच्या हितासाठी काम करत आहे. पक्षात गद्दारी झाल्यानंतरही उद्धव ठाकरे हे चांगल्या पद्धतीने संघटन कौशल्य वापरून काम करीत आहेत, असे विचारे म्हणाले.