ठाणे – पाकिस्तानची दहीहंडी मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारतीय सैनिकांनी फोडून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली, असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यातील टेंभीनाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेली दिघेसाहेबांची सोन्याची हंडी याठिकाणी उपस्थित गोविंदासोबत संवाद साधत त्यांना प्रोत्साहित केले.
धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेली टेंभीनाका येथील दहीहंडीची परंपरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे. ठाणे शहरातील ही मानाची दहीहंडी मानली जाते. दिघे यांच्यानंतर ही दहीहंडी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जाते.त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वप्रथम या दहीहंडीला भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवतात. नेहमीप्रमाणे यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाक्याच्या दहीहंडीला भेट देऊन गोविंदाना प्रोत्साहित केले. यावेळी पाकिस्तानची दहीहंडी मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारतीय सैनिकांनी फोडून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली असे वक्तव्य शिंदे यांनी केले.
ज्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये आपल्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे पाप केले. त्या दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदुर, ऑपरेशन महादेव यशस्वी करत चोख उत्तर दिले. त्यामुळे आता हंडी तर, तुम्ही फोडा परंतू, पाकिस्तानने जर परत हंडी लावण्याचा प्रयत्न केला तर, त्याची हंडी कायमची आपल्याला फोडून टाकायची आहे. पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैनिक पाकिस्तानला धडा शिकवायला तयार आहेत. परंतू, जर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी वेळ पडली तर, तुम्ही पण सैनिकांच्या बरोबर उभे राहणार असे आवाहन असे शिंदे यांनी गोविंदांना केले.आपण आता सर्व वस्तू बनवत आहोत, त्यामुळे भारत देश हा मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर बनत आहे, असेही ते म्हणाले.