कल्याण-डोंबिवली परिसरात काँग्रेसचे अस्तित्व शून्य होते. त्यानंतर आलेली राष्ट्रवादी काँग्रेस हिंगासारखी या भागात दिसून आली. कल्याण मतदारसंघात तीस वर्षांपूर्वी दिवंगत नकुल पाटील यांनी आमदारकीची निवडणूक लढवून मिळविलेला विजय हाच काय तो काँग्रेसचा भाग्योदय.
पाटील हे आगरी समाजातील सुशिक्षित नेतृत्व. राजकारणात उगवते नेतृत्व पुढे जातंय म्हणून एकवटलेल्या आगरी समाजाने नकुल पाटील यांना पक्षीय गणिते बाजूला ठेवून निवडून आणले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खास मर्जीतले सहकारी म्हणून ते ओळखले जात होते. पुलोद सरकारच्या काळात नकुल पाटील नागरी पुरवठा मंत्री होते. नंतरच्या काँग्रेस राजवटीच्या काळात पाटील यांना दोन वेळा सिडकोचे अध्यक्षपद मिळाले. जुनेजाणते डोंबिवलीकर म्हणून पाटील यांची ओळख होती. सरकारमध्ये मानाचे स्थान असूनही पाटील यांनी शहरासाठी कोणते योगदान दिले तर शून्य, असेच लोक बोलतात.
हायकमांड ते प्रदेशाध्यक्षांवर कमांड असलेले काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांचे कल्याणमध्ये वास्तव्य आहे. आमदार दत्त यांनी काँग्रेसमधील स्वत:च्या सामर्थ्यांचा सदुपयोग केंद्र, राज्यात काँग्रेसची सत्ता असताना केला असता तर, आज केंद्र सरकारला कल्याण-डोंबिवलीचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याची गरजच लागली नसती. इतका विकास कामांचा ओघ दत्त यांच्या काँग्रेस सरकारमधील शब्दाने कल्याण-डोंबिवलीत वाहू लागला असता. परंतु, त्या काळात संजय दत्त यांनी फक्त मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणे, दिल्लीहून काँग्रेस नेते, युवराज राहुल गांधी येणार असतील तर त्यांची बडदास्त व नियोजन करणे यामध्ये वेळ दवडला.
या नेत्यांच्या आसऱ्याला अलका आवळसकर, रवी पाटील, सचिन पोटे, विश्वनाथ राणे (आता शिवसेनेत), जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, दिवंगत पंडित भोईर, त्यांचे वारस, नवीन सिंग ही मंडळी वावरली. ही सगळी मंडळी नगरसेवक होऊनही आपल्याच कोशात आणि गटबाजीत अडकून पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पुंडलिक म्हात्रे नगरसेवक, मग महापौर झाले. त्यांच्या काळात शहर विकासापेक्षा विकासक, ठेकेदार यांनाच बरकतीचे दिवस आले. राष्ट्रवादीत यथेच्छ मिरवून झाल्यानंतर म्हात्रे यांनी शिवसेनेत उडी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव जुने कल्याणकर. मोठय़ा साहेबांचे उजवे आणि अजित पवार यांच्या डाव्या खिशातले म्हणून ते ओळखले जातात. आपले जन्मस्थान मुरबाड, महिला बचत गट आणि अजित पवार एवढाच त्यांचा साम्राज्य विस्तार राहिला. त्यामुळे ते ना कधी मोठे झाले, त्यांनी कोणाला केले आणि ना आपल्या कर्मभूमीला मोठे केले.
या मंडळींना आपल्या वतनदाऱ्या सांभाळण्यात, घरापुढे लाल दिवा ठेवण्यात मोठेपणा असतो. शहराच्या विकासाशी, येथल्या जनतेशी या मंडळींना काही देणेघेणे नसते, नव्हते. ही मातब्बर मंडळी सत्ता, खुर्चीत असतात तेव्हा त्यांच्या माजात असतात. विकासाची कोणतीही दूरदृष्टी नसल्याने खुर्ची अडवून फक्त शहराचा चोथा आणि वाळवंट करतात. जे शिवसेना-भाजपने केले. तेच विरोधी बाकावरील काँग्रेसच्या आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी केले.