कल्याण – वडील एका गुन्ह्यात तुरूंगात गेलेले. त्यामुळे घरात चार वर्षाची असलेल्या बालिकेला सांभाळण्यास कोणी नाही म्हणून या बालिकेच्या रायगड जिल्ह्यातील भिवपुरी जवळील चिंचवली येथे राहत असलेल्या मावशीने तिला सांभाळण्यास मागील वर्षी नेले. अज्ञानी असल्याने बालिकेच्या हातून घरात वागताना काही चुका होत होत्या. त्या सहन न झाल्याने बालिकेच्या काकाने रागात केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा तपास करून कोळसेवाडी पोलिसांनी वर्षभरानंतर बालिकेच्या खूनप्रकरणी पती, पत्नीला अटक केली.

अपर्णा अनिल मकवाना उर्फ अपर्णा प्रथमेश कांबरी, प्रथमेश प्रवीण कांबरी असे अटक करण्यात आलेल्या पती, पत्नीचे नाव आहे. ते रायगड जिल्ह्यातील भिवपुरी रस्त्यावरील चिंचवली येथील रहिवासी आहेत. अपर्णा ही मृत बालिकेची मावशी आहे.

या बालिकेच्या खुनाचे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे होते. कोळसेवाडी पोलिसांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून याप्रकरणातील आरोपींना अटक केली. गेल्या वर्षी कल्याण पूर्वेतील खडेगोळवलीत राहणाऱ्या ज्योती सातपुते यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आपल्या चार वर्षाच्या भाचीचे तिच्या भिवपुरी चिंचवली येथे राहणारी मावशी अपर्णा आणि तिचा पती प्रथमेश यांनी अपहरण केले आहे अशी तक्रार केली होती. राहुल घाडगे या बालिकेचे वडील. ते एका गुन्ह्यात तुरूंगात असल्याने बालिकेला सांभाळण्यास कोणी नव्हते.

कोळसेवाडी पोलीस या बालिकेच्या अपहरण प्रकरणाचा तपास करत होते. त्यांना या प्रकरणातील आरोपी प्रथमेश आणि अपर्णा कांबरी हे त्यांच्या रायगड जिल्ह्यातील भिवपुरी रस्त्यावरील चिंचवली येथील घरी येणार आहेत, अशी गुप्त माहिती दोन दिवसापूर्वी मिळाली. पोलिसांनी चिंचवली गाव परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक माहिती उघड झाली.

मुलगी चार वर्षाची होती. ती अज्ञानी असल्याने ती घरात कोठेही प्रातर्विधी करायची. तिला सतत समजुनही कळत नव्हते. एक दिवस असाच प्रकार घडल्यानंतर अपर्णाचा पती प्रथमेशने बालिकेला रागाच्या भरात बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. रात्रीच्या वेळेत बालिकेला गोणीत भरून त्या भोवती गादी गुंडाळून बालिकेला चिंचवली शिवारातील निर्जन स्थळी फेकून देण्यात आले. हा सगळा प्रकार या दाम्पत्याने पोलिसांना सांगितला. हा क्रूर प्रकार ऐकून पोलीस चक्रावून गेले. ही माहिती ऐकल्यानंतर पोलिसांनी कांबरी दाम्पत्याला अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.