कारवाईच्या भीतीने आकार मर्यादित; खड्डे खणण्याऐवजी खांबांना आधार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक उत्सवांच्या मंडपांसाठी रस्त्यावर खड्डे खोदले तर प्रत्येक खड्डय़ामागे दोन हजार रुपये दंड भरण्याची तंबी महापलिका प्रशासनाने उत्सव मंडळांना दिली असून  दंडात्मक कारवाईच्या भीतीने शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी यंदा खड्डेविरहित मंडप उभारल्याचे चित्र दिसून येत आहे. लोखंडी खांबांचा वापर करून हे मंडप उभारण्यात आले आहेत. तर मंडपाच्या परिसरात विद्युत रोषणाईसाठी खड्डे खोदण्याऐवजी वाळूने भरलेल्या स्टीलच्या डब्यांचा वापर केला आहे.  इतकेच नव्हे तर दरवर्षी निम्याहून अधिक रस्ता व्यापणाऱ्या गणेश उत्सव मंडळांनी यंदा मात्र पालिकेच्या नियमावलीनुसार मंडप उभारणी केली असून त्यामुळे शहरातील रस्ते अडविण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येते.

सार्वजनिक उत्सवांसदर्भात धोरण ठरविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनवाणीदरम्यान महापालिकांना दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने सार्वजनिक उत्सवांसाठी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनंतरही शहरात अनेक ठिकाणी ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त मंडप उभारून रस्ता अडविला जात होता. त्याचप्रमाणे उत्सवाच्या मंडपासाठी रस्त्यावर खड्डे खोदले जात होते. अशा मंडळांवर महापालिकेकडून कारवाई केली जात होती. रस्त्यावर खड्डे खोदले म्हणून काही मंडळांवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतही शहरात खड्डे खोदण्याचे  प्रकार सुरू होते. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या महिन्यात महापालिकेत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी नवे तंत्रज्ञान वापरून खड्डेविरहित मंडप उभारण्याच्या सूचना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्याचबरोबर उत्सवाच्या मंडपासाठी रस्त्यावर खड्डे खोदले तर प्रत्येक खड्डय़ामागे  दोन हजार रुपये दंड  वसुल केला जाईल, अशी तंबीही महापालिकेने मंडळांना दिली होती. त्यामुळे अनेक मंडळांनी कारवाईच्या भीतीपोटी यंदाच्या वर्षी खड्डेविरहित मंडप उभारल्याचे चित्र पाहाव्यास मिळते. शहरातील शास्त्रीनगर नाका, पोखरण रोड क्रमांक दोन, माजीवाडा, वसंतविहार, लोकमान्यनगर, पवारनगर, इंदिरानगर, वर्तकनगर, बे-केबिन, ठाणे महापालिका परिसर या भागांतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी खड्डेविरहित मंडप उभे केले आहेत.

उत्सवाच्या मंडपासाठी रस्त्यावर खड्डे खोदून बांबू रोवले जायचे. परंतु यंदाच्या वर्षी खड्डय़ांऐवजी लोखंडी खांबांचा आधार घेण्यात आला आहे. हे खांब रस्त्यावर उभे करून त्याद्वारे मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्युत रोषणाईसाठीही रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदले जात होते. त्या ठिकाणी स्टीलच्या डब्यांचा वापर करण्यात आला आहे. या डब्यांमध्ये वाळू किंवा माती भरून त्यात बांबू रोवण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या मंडपासाठी खड्डे खोदू नयेत, वाहूतक तसेच रहदारीस अडथळा होऊ नये याविषयी मंडळांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. अनेक मंडळांनी यंदा मंडपाचे नियम पाळून पालिकेला सहकार्य केले आहे.     – अशोक बुरपुल्ले; उपायुक्त-अतिक्रमण विभाग, ठामपा

यंदाच्या वर्षी आम्ही मंडपासाठी खड्डे खोदले नाहीत. ज्या ठिकाणी मंडप उभारला आहे, त्या ठिकाणी बांबूंना पत्र्याचा आधार दिला आहे. महापालिकेने दिलेल्या नियमानुसार यंदा मंडप उभारण्यात आला आहे.      – विवेक घाडगे; अध्यक्ष- डवलेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Authorized ganpati mandap in mumbai
First published on: 16-09-2018 at 01:15 IST