अंबरनाथ तालुक्यातील घटना,  रुग्णवाहिका, वेळीच उपचार न मिळाल्याने दुर्दैवी घटना

अंबरनाथ : एकीकडे करोनाच्या संकटात आरोग्यसेवेला प्राधान्य दिले जात असताना इतर आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथील म्हात्रेपाडा वाडीतील कातकरी महिलेची रुग्णालयात जात असताना टेम्पोतच प्रसूती झाली. याच दरम्यान प्रसूत झालेल्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची ढिसाळ बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे. गेल्या वर्षभरातील प्रसूतीची ही तिसरी वेळ असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

करोनाच्या संकटात तातडीने आरोग्य व्यवस्था उभारण्याकडे आरोग्य यंत्रणांचा कल असला तरी इतर आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी वांगणी येथील एका खासगी डॉक्टरकडून बेकायदेशीर पद्धतीने करोनावर उपचार केले जात असल्याचे दिसून आले होते. तर तालुक्यातील मांगरूळ येथील आरोग्य केंद्रातून लशींची चोरी झाल्याचेही समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच मांगरूळ येथील एकमेव आरोग्य केंद्रातील असुविधांमुळे एका नवप्रसूत महिलेला आपल्या नवजात बाळाला गमावण्याची वेळ आली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथील म्हात्रेपाडा वाडीच्या रहिवाशी वंदना वाघे यांना प्रसूतीकळा येऊ लागल्याने मांगरूळ येथील केंद्रात नेण्यात आले. मात्र हे केंद्र बंद असल्याने त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहोचण्यासाठी त्यांना उपलब्ध असलेल्या टेम्पोमध्ये नेण्यात आले.  रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या महिलेची टेम्पोतच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर वेळीच उपचार न मिळाल्याने वंदना वाघे यांचे नवजात बालक दगावले. महिलेला वेळीच उपचार आणि रुग्णवाहिका मिळाली असती तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती असा आरोप आता होत आहे.

मांगरूळमधील आरोग् केंद्राची रुग्णवाहिका बंदच

मांगरूळच्या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. करोना काळात गर्भवती राहिलेल्या या महिलेने डॉक्टरांनी सुचवल्यानंतरही सोनोग्राफी केली नसल्याची बाब या केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे प्रसूतीचा काळ लक्षात आला नाही. येथे प्रसूतीची सुविधाही नसल्याचे समोर आले आहे.