लसीकरण केंद्रांवर केवळ दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांची गर्दी
पूर्वा साडविलकर
ठाणे : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून करोना प्रादुर्भाव ओसरल्याची सकारात्मक बाब समोर आली असतानाच, दुसरीकडे करोना प्रादुर्भाव ओसरल्यामुळे नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अद्यापही पाच लाख नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली नाही. सध्या लसीकरण केंद्रांवर दुसरी मात्रा घेणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे. जिल्ह्यात आढळून येणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत मागील आठवडय़ाभरापासून घसरण झाली आहे. करोना संसर्ग ओसरल्याचा परिणाम करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर मागील काही दिवसांपासून लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात १८ वर्षांपुढील नागरिकांची संख्या ७३ लाख ४६ हजार ७९२ इतकी गृहीत धरण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६८ लाख ४० हजार २७० नागरिकांनी लशीची पहिली मात्रा तर, ५८ लाख १३ हजार ५९२ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. अद्यापही जिल्ह्यातील पाच लाख ६ हजार ५२२ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. लसीकरण केंद्रांवर पुरेशा प्रमाणात लससाठा उपलब्ध असतानाही नागरिकांची लसीकरण केंद्रांवर तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्येही पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळत आहे.
निर्बंधमुक्तीपासून वंचित
ठाणे जिल्ह्यात अद्यापही पहिल्या मात्रेचे प्रमाण ९० टक्के पूर्ण झालेले नसल्यामुळे ठाणे जिल्हा शिथिलीकरणापासून वंचित आहे. जिल्ह्यात पाच लाख ६ हजार ५२२ नागरिकांनी अद्यापही लशीची पहिली मात्रा घेतलेली नाही. जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसात केवळ २८ हजार ९८८ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा तर, २ लाख ४४ हजार १२१ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे.