बदलापूरः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यंदा मुरबाडच्या कुडशेत केवारवाडी येथे हिरव्या देवाची यात्रा भरली होती. या यात्रेत पारंपरिक कार्यक्रमांसह जैवविविधता नोंद करणाऱ्या पाच युवकांना गौरवण्याचा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. आय नेचरालिस्ट या ऍपच्या माध्यमातून मुरबाडची जैवविविधता नोंदवण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून जगाला मुरबाड आणि आसपासच्या परिसरातील वनस्पती, पक्षी, प्राण्यांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे दुर्मिळ गोष्टींही प्रकाशझोतात येणार आहेत.
निसर्गाशी नाते सांगणारी अनोखी यात्रा म्हणून मुरबाड तालुक्यात आयोजीत केली जाणारी हिरव्या देवाची यात्रा आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यंदा मुरबाडच्या कुडशेत केवारवाडी येथे यात्रेचा पहिला टप्पा संपन्न झाला. श्रमिक मुक्ती संघटना, वन निकेतन, अश्वमेध प्रतिष्ठान सह केवरवाडीच्या ग्रामस्थानी यासाठी पुढाकार घेतला. मुरबाडचे तहसिलदार अभिजीत देशमुख यांनी वृक्षांची पुजा करून यात्रेला सुरूवात झाली. यावेळी आयोजक आणि श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळेही उपस्थित होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रानभाज्या स्पर्धेत ७ वाड्यांच्या ३७ महिलांनी भाग घेतला. तसेच यावेळी विविध ४० प्रकाराच्या रानभाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. निसर्ग रांगोळी स्पर्धेत ७ मुलींनी भाग घेतला तर निसर्ग चित्रकलेत ४९ मुलांनी भाग घेतला. जैवविविधता छायाचित्र स्पर्धेत ५ युवकांनी भाग घेऊन एका आठवड्यात १३५ जैविक प्रजातींचे फोटो आय नेचरालिस्ट या ऍपवर अपलोड करून स्थानिक जैव विविधतेचा माहितीचा खजिना खुला केला. त्या सर्वांचा यावेळी गौरव करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाद्वारे आता मुरबाड आणि आसपासच्या भागातील जैवविविधतेची नोंद होणार आहे.
या आय नेचरालिस्ट ऍपवर जैवविविधतेचे छायाचित्र अपलोड करण्याचे आवाहन आदिवासी तरूणांना करण्यात आले होते. आठवडाभरापूर्वी त्याचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले. त्यांनी १३५ छायाचित्रे संकलीत केली. शेती, रानभाज्या संकलन करत असताना निसर्गात फिरणाऱ्या कातकरी तरूणांना त्याच जैवविविधतेची नोंद करायला दिल्यास विधायक कार्य होईल या हेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
जैवविविधतेच्या नोंदीचा फायदा काय
या ऍपद्वारे फले, फळ, झाडे, पक्षी, कीटक अशा सर्व जैवविविधतेची नोंद झाल्यास ते एका क्षणात संपूर्ण जगाला कळेल. येथे छायाचित्र अपलोड केल्यानंतर त्यावरची अधिकची माहिती उपलब्ध होऊ शकेल. जगातही तशाच प्रकारचे जीव असतील तर त्याची माहिती मिळेल. जर दुर्मिळ असतील तर त्याचीही माहिती सर्वांना होईल आणि त्यांच्या रक्षणासाठी काम करता येईल, अशी माहिती अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड यांनी दिली आहे. निसर्गप्रेमींना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही हरड यांनी केले आहे.