बदलापूर: बदलापूर पूर्वेतील संभाजी नगर परिसरात असलेल्या बीएसयुपी घरकुल योजनेतील एका इमारतीत घरातील स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत महिला आणि दीड वर्षांचा चिमुकला सुदैवाने बचावला आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहणी केली. देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप होतो आहे. यामुळे जुन्या झालेल्या बीएसयुपी घरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बदलापूर पूर्वेकडील संभाजी नगर परीसरात बीएसयुपी घरकुल योजनेच्या २० ते २५ इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्या प्रकल्पातील १९ क्रमांकाच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या रवी चव्हाण यांच्या घरातील स्वयंपाक घरातील स्लॅबचे प्लास्टर मंगळवारी रात्री सातच्या सुमारास कोसळले. यावेळी यांच्या पत्नी स्वयंपाक घरात काम करत होत्या. तर त्यांचा दीड वर्षांचा मुलगा शेजारीच खेळत होता. सुदैवाने दोघे जण यातून बचावले. मात्र त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर ते यातून बचावले असले तरी त्यामुळे बीएसयुपी इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने २०१० मध्ये या इमारतींची उभारणी केली. तर २०१३ मध्ये काही रहिवाशांना घरांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर या इमारतींची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही असा आरोप स्थानिक रहिवासी करतात. कोणत्याही प्रकारे देखभाल दुरुस्ती न केल्याने या प्रकल्पातील अनेक इमारतींचे छत गळत असून त्यामुळे ते कोसळण्याची भीती रहिवाशांना वाटते. त्यामुळे या इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड या प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. तर रात्री कुळगाव बदलापूर नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहणी केली. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.