बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा–राष्ट्रवादी– रिपाइं युतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्षपदासाठी रुचिता घोरपडे यांनी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे एकत्रपणे सहभागी झाले होते. हीच खरी युती असल्याची प्रतिक्रिया यावेळी कपिल पाटील यांनी दिली.
या मिरवणुकीची सुरुवात बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादनाने झाली. तेथून बाजारपेठ, स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल मार्गे मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक पुढे निघाली आणि गांधी चौक मार्गे नगर पालिका मुख्यालयात दाखल झाली.
यावेळी रुचिता घोरपडे यांनी भाजपा–राष्ट्रवादी– रिपाइं युतीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी युतीतील प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कॅबिनेट मंत्री व परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, तसेच भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी हे मान्यवर उपस्थित होते. या वेळी भाजपा व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी–कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. विशेषत: महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
बदलापुरात निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट लढाई होणार आहे. शिवसेनेच्या वतीने वीणा वामन म्हात्रे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. शिवसेनेला आव्हान देण्यासाठी भाजपने मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे येथे कडवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
हीच खरी युती – कपिल पाटील
सध्या कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष युतीत आहेत. हीच युती राज्यातही आहे. फक्त एक पक्ष बाहेर आहे त्यामुळे हीच खरी युती असल्याचे मत यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
बदलापूर या नावाप्रमाणे बदलापूर निश्चितपणे बदल करणार आणि रुचिता घोरपडे नगराध्यक्ष होणार असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. अनेक घटना घडूनही लोकसभेत भाजपला बदलापुरात २० हजार, विधानसभेत.त्यापेक्षा जास्त मताधिक्य होते. त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार, असेही पाटील म्हणाले.
आमचे मतभेद असू शकतात पण…
आज माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे एकत्र आले होते. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावर कपिल पाटील यांना माध्यमांनी छेडले असता, राजकीय नेत्यांमध्ये व्यक्तिगत वाद नसतात, मतभेद असू शकतात. अनेक जण म्हणतात आमच्यात विस्तव जात नाही असे म्हणतात, पण आमच्यातून मतभेद नक्कीच जाईल, असेही यावेळी कपिल पाटील म्हणाले. माध्यमांनी असे वृत्त देऊन संभ्रम निर्माण करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
