बदलापूर : बदलापूर शहरात पूर्व-पश्चिम प्रवासासाठी महत्त्वाचा असलेला एकमेव उड्डाणपूल खड्ड्यांमुळे कोंडीचा केंद्र बनतो आहे. शनिवारीही सकाळी १० वाजल्यापासून उड्डाणपुलावर मोठी कोंडी झाली होती. खड्डे पडल्याने उड्डाणपुलावर वाहने संथ गतीने चालतात. परिणामी पश्चिमेतून पूर्वेत आणि पूर्वतून पश्चिमेत जाण्यासाठी रांगा लागतात. शनिवारी शेजारचा भुयारी मार्गही पाणी वाढल्याने बंद झाला होता. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसला.

बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात लोकसंख्या आणि पर्यायाने वाहनांची संख्याही वाढली. त्यामुळे काही वर्षांपर्यंत प्रशस्त आणि भव्य वाटणारे रस्ते आता अरुंद वाटू लागले आहेत. त्यामुळे शहरात कोंडी वाढली आहे. काही महत्त्वाच्या चौकांमध्ये होणारी कोंडी फोडण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी चौक विस्तारीकरणाची मोहीम हाती घेतली. ही मोहीम सध्या सुरू असून शहरातल्या काही चौकांमध्ये यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही सध्याच्या घडीला पूर्व आणि पश्चिम प्रवास करण्यासाठी एकमेव उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलावर सातत्याने कोंडी होत असल्याने वाहन चालक त्रस्त आहेत.

शनिवारीही या एकमेव उड्डाणपूलावर मोठी कोंडी झाली होती. सकाळी १० वाजल्यापासून वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर येथे कोंडी वाढू लागली. ११ ते १२च्या सुमारास संपूर्ण उड्डाणपूल वाहनांनी गच्च भरला होता. उड्डाण पुलावर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून वाहने संथ गतीने चालतात. परिणामी मागे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पश्चिम भागात ही रांग अंबरनाथच्या दिशेला दत्त चौकापर्यंत तर रेल्वे स्थानकाकडे बस स्थानकापर्यंत जाते. उड्डाणपुलावर कोंडी होताच दोन्ही बाजूचे चौक वाहनांनी भरून जातात. त्यामुळे रेल्वे स्थानकांकडून अंबरनाथ तसेच बेलवली भागात जाण्यासाठी रस्ता उरत नाही. तर पूर्व भागात जुन्या नगरपालिका कार्यालया बाहेरही वाहनांच्या रांगा लागल्याने मोठी कोंडी होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी शेजारच्या अरुंद अशा भुयारी मार्गात नाल्याचे पाणी शिरले होते. एक ते दीड फुटापर्यंत नाल्यातून पाणी वाहत होते. तरीही अनेक वाहनचालक त्यातून दुचाकी आणि रिक्षा दामटवत होते. उड्डाण पुलावर कोंडी असल्याने अनेक शालेय विद्यार्थी आणि पालक याच पाण्यातून मार्ग काढत जात होते. त्यामुळे अपघाताची ही भीती होती. मात्र पर्याय नसल्याने वाहन चालक आणि पादचारी हा धोकादायक मार्ग स्वीकारत होते.