बदलापूर : जुना पुणे लिंक रस्ता म्हणून ओळखला जाणारा बदलापूर कर्जत मार्गाच्या गोरेगाव ते वांगणीपर्यंतच्या भागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ज्या भागात कॉंक्रिटचा पट्टा संपतो त्या भागात रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या भागात खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांत संतापाचे वातावरण आहे. आधीच या मार्गात पथदिव्यांची सुविधा नाही, त्यात खड्ड्यांचा आकार मोठा असल्याने त्याचा रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर परिणाम होतो आहे. शारिरीक स्वास्थ बिघडण्यासह मानसिक संतापही वाढत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करतात.

बदलापूर शहरातून जाणारा कर्जत राज्यमार्ग हा खोपोलीमार्गे लोणावळा, पुणे आणि त्या पुढील प्रवासासाठी महत्वाचा आहे. कल्याणपासून, अंबरनाथ बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातून अनेक प्रवासी लांबच्या पल्ल्यासाठी हा मार्ग निवडतात. बदलापूर शहरापासून वांगणीपर्यंत अनेक प्रवाशांसाठीही दररोजचा मार्ग म्हणून महत्वाचा आहे. मात्र या मार्गाची सातत्याने पावसाळ्यात दुरावस्था होत असल्याचे समोर आले आहे. यंदाच्या पावसाळ्यातही हा मार्ग खड्ड्यांपासून वाचू शकलेला नाही.

बदलापूर ते कर्जतपर्यंतच्या मार्गाचे गेल्या काही वर्षांपासून कॉंक्रिटीकरण सुरू झाले आहे. यातील बहुतांश पट्टा कॉंक्रिटचा करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अजुनही कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. सध्या बदलापूरपासून कर्जतच्या दिशेने गोरेगाव पर्यंतचा रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला आहे. मात्र त्यापुढे वांगणीपर्यंतचा रस्ता अजुनही डांबरी आहे. या रस्त्याला वर्षानुवर्षे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात हे खड्डे अधिक रूंद आणि खोल होतात. त्यामुळे येथून जाताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

या भागात अनेक लहान मोठी गावे, पुढे वांगणी शेलू यांसारखी निम्न शहरे आहेत. यातील अनेक वाहनचालक रस्ते मार्गाने बदलापूर, अंबरनाथ आणि पुढचा प्रवास करतात. या दरम्यान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून रिक्षाही चालतात. या सर्वांना या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकदा येथे वाहनचालकांचे अपघात होतात. दररोज व्यवसाय करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा आर्थिक आणि शारिरीक भुर्दंड बसतो आहे. वाहनांचे भाग खिळखिळे होत असून शारिरीक व्याधीही वाढल्याचे प्रवासी सांगतात.

सध्या तरी खड्ड्यांचाच प्रवास

या पट्ट्यातील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या तरी या रस्त्यावर खडीच्याच माध्यमातून खड्डे भरले जाणार हे निश्चित झाले आहे. तसेच पाऊस थांबल्यानंतरही येथे डांबरी पट्टेच मारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना खड्डेमुक्त कॉंक्रिट प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.