बदलापूरः केरळात सरासरी वेळेच्या आधीच दाखल झालेल्या मोसमी पावसामुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे मे महिन्यातच बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने बदलापूर शहराला पूराचा जणू इशाराच दिला. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास उल्हास नदी १७.१९ मीटर या पातळीवरून वाहत होती. सकाळी ११ वाजताच नदीने १६.५० मीटर ही आपली इशारा पातळी ओलांडली होती. सुदैवाने नदीने १७.५० मीटरची धोका पातळी ओलांडली नाही. अन्यथा शहराला पुन्हा पुराचा सामना करावा लागला असता.
हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार सोमवारी पहाटेपासूनच पावसाने रौद्ररूप धारण केले होते. पहाटे साडे चार वाजल्यापासून बदलापूर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांच्या कडकडाटाने बदलापूर, वांगणी आणि आसपासचा परिसर दणाणून सोडला होता. सकाळी दहा वाजेपर्यंत काळ्या ढगांची गर्दी आकाशात होती. पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत या अवघ्या चार तासांच्या काळात तब्बल १६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी रायगड जिल्ह्यातील कर्जत, नेरळ, माथेरान या भागात मुसळधार पाऊस सुरू अशल्याने उल्हास नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. सकाळी ११च्या सुमारास उल्हास नदीने १६.५० ही इशारा पातळी ओलांडली. त्यानंतर स्थानिक पालिका आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली.
काही वेळातच उल्हास नदीची पातळी १७ मीटरवर येऊन पोहोचली. त्यानंतर उल्हास नदीच्या किनारच्या सोनिवली, रमेशवाडी, हेंद्रेपाडा, मांजर्ली, बॅरेज रस्ता या भागात नागरिकांना खबरदारीच्या सूचना अग्नीशमन विभागाच्या वतीने देण्यात आल्या. दुपारी दोनच्या सुमारास सोनिवली भागातील स्वाभिमान नगर आणि आसपासच्या चाळीतील सुमारे १०० कुटुंबांना शेजारच्या बीएसयुपी घरांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांंडली नसल्याने शहरातल्या घरांमध्ये पाणी शिरले नसल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
भुयारी मार्गात पाणी
पहिल्याच मोठ्या पावसात शहरातील एकमेव भुयारी मार्ग पाण्याखाली गेला. रेल्वे प्रशासनाच्या फसलेल्या नियोजनामुळे कोट्यावधींचा खर्च करूनही हा मार्ग पाण्याखाली जातो आहे. सोमवारी सकाळी व्यावसायिक चारचाकी या भुयारी मार्गातील पाण्यात अडकली. चालकाने जीव वाचवला असला तरी पाणी वाढल्याने ही चारचाकी पाण्यात बुडाली. रेल्वे आणि पालिका कर्मचाऱ्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने कार पाण्यातून काढली. शहरातील मासळी बाजाराशेजारचा भुयारी मार्गही असाच पाण्याखाली गेला होता. तर अंबरनाथ तालुक्यातील कुडसावरे पुल पाण्याखाली गेल्याने आसपासच्या गावांचा संपर्क तुटला होता. बदलापूर कर्जत राज्यमार्गावर काही काळ उल्हास नदीचे पाणी आले होते. मात्र पाण्याचे प्रमाण कमी असल्याने यावरून वाहतूक सुरू होती.
बदलापूर, अंबरनाथच्या पाणीपुरवठ्यावर परिणाममुसळधार पावसामुळे बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्याचा परिणाम उल्हास नदीवर असलेल्या आणि अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर झाला. येथील केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी उचल आणि प्रक्रिया करण्याचे काम ठप्प झाले. परिणामी सोमवारी आणि मंगळवारी होणारा पाणी पुरवठा अनियमीत आणि कमी दाबाने होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.
पाणी गाळून, उकळून प्या
मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास मोठ्या प्रमाणावर गाळही साचत असतो. त्यामुळे पाणी गढूळ येत असते. हे पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने केले जाते. मात्र त्यानंतरही गढुळता टिकून असते. आताही ही गढुळता वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
नदीच्या पाणी पातळीचा अंदाज घेऊन नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. पण सायंकाळी ५ नंतर पाणी पातळीत घट दिसून आली आहे. तरीही वेळेप्रसंगी सुमारे १२ हजार नागरिकांना स्थलांतरीत करता येऊ शकेल अशी व्यवस्था केली आहे. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. – मारूती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.
उल्हास नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहोत. मी स्वतः कर्जत तालुक्याच्या तहसिलदारांच्या आणि रायगड प्रशासनाच्या संपर्कात आहे. ग्रामीण भागात कुडसावरेचा पूल पाण्याखाली आहे. इतर ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. – अमित पुरी, तहसिलदार, अंबरनाथ तालुका.