भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात भाईंदर पूर्वेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाच्या निर्मितीकरिता राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तसेच याकरिता संपूर्ण ३८ कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे. त्याबाबतचे पत्र महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले असून यामुळे मीरा-भाईंदरमधील हा भव्य प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाईंदर पूर्व मौजे गोडदेव आरक्षण क्रमांक १२२ या जागेत बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनाचे काम महासभेतही मंजूर करण्यात आले होते. या प्रकल्पाला शासनाने मंजुरी व संपूर्ण निधी द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. पालकमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्यानंतर अखेर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने याबाबत लेखी पत्र काढून संपूर्ण प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

३८ कोटींचा खर्च अपेक्षित

आरक्षण क्रमांक १२२ येथे  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारणे या कामाचे संकल्पचित्र पूर्णपणे तयार आहे. हे कलादालन उभारण्याचा एकूण खर्च जवळपास ३८ कोटी असून त्यास शासनस्तरावरून मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल, असे नगरविकास विभागाचे अप्पर सचिव विवेक कुंभार यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.