वसईत बालकुमार साहित्य संमेलन

वसईत भरलेल्या ८ व्या बालकुमार मराठी साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी कविता, कथा, नाटय़कृती सादर करून आपल्यातील सृजनशीलतेचे अनोखे दर्शन घडवले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जागृती इंगळे या विद्यार्थिनीने भूषविले. सहकार शिक्षण संस्था आणि वसई-विरार महापालिकेच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

वसई रोडच्या जी. जे. वर्तक विद्यालयातील ‘चित्रकार मानकर काका बालकुमार साहित्य नगरीत’ हे संमेलन पार पडले. संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध बालसाहित्यिक प्राचार्य डॉ. अरविंद पाटोळे यांच्या हस्ते झाले. संमेलनाची सुरुवात ग्रंथिदडीने झाली. साईबाबा मंदिरापासून ती सुरू होऊन अभंग, भजन, भारुडे, फुगडय़ा, लेझीम खेळत ही िदडी बालनगरीत पोहोचली. आपल्या भाषणात पाटोळे यांनी वसईच्या वैभवशाली इतिहासाचा उल्लेख केला. चिमाजी अप्पांच्या पराक्रमामुळेच वसईत चैतन्य सळसळत असते, असे ते म्हणाले. स्वत:च्या मनाने लिहिलेले साहित्य चांगले असते. चांगल्या साहित्यनिर्मितीसाठी निरीक्षण, अनुभव आणि आकलन यांची आवश्यकता असते, त्यामुळे आपल्या साहित्याला निरीक्षणाची जोड द्या, असे आवाहन त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालसाहित्यिक पु. ग. वनमाळी हे द्रष्टे व दूरदृष्टीचे होते. म्हणूनच त्यांनी या बालसाहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवल्याचे ते म्हणाले. संमेलनाचे अध्यक्षपद वर्तक महाविद्यालयाची विद्यार्थिनी जागृती इंगळे हिने भूषविले. ‘मला समजून घ्या’ या सुनील जाधव लिखित पुस्तकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.