कल्याण – कल्याण पूर्वेतील सूचकनाका भागातील एका पानटपरीवरून कोळसेवाडी पोलिसांनी शनिवारी एक लाख १२ हजाराचा प्रतिबंधित पान मसाल्याचा साठा जप्त केला. या पानटपरी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरुध्द अन्न व सुरक्षा मानक कायद्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप बसंत गुप्ता (४१) असे अटक करण्यात आलेल्या पान टपरी चालकाचे नाव आहे. गौतमनगर, सूचकनाका, शिळफाटा रस्ता भागात जयदीप यांची पान टपरी आहे.

कल्याण पूर्वेतील सूचकनाका भागातील एक पान टपरी चालक प्रतिबंधित पान मसाला विकत आहे, अशी गुप्त माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांना मिळाली होती. या माहितीची खात्री पटल्यावर वरिष्ठांच्या आदेशावरून साहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव, उपनिरीक्षक मोरे, हवालदार विशाल वाघ यांचे पथक जयदीप गुप्ता यांच्या टपरी समोर शनिवारी संध्याकाळी अचानक धडकले. पोलिसांना पाहताच जयदीप यांची गडबड झाली.

पोलीस पथकाने जयदीप यांच्या पान टपरीची झडती घेतली. त्यावेळी त्यांना बाजीराव पान मसाल्याचे ७५ हजार रूपये किमतीचे ३०० पाकिट, मस्तानी सुंगधित तंबाखुचे २५० पाकिट मिळून आले. राज कोल्हापुरी मसाला, आरके फोर तंबाखुचे एकूण ४०० पाकिटे असा एकूण एक लाख १२ हजार रूपयांचा साठा पोलिसांना आढळून आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा साठा पाहून पोलीस चक्रावून गेले. पोलिसांनी जयदीप यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. कल्याण शिळफाटा रस्त्यालगतचे अनेक पान पटरी चालक, बिअर बार, हाॅटेल्स, ढाब्यांचे बाजुचे पान टपरी चालक प्रतिबंधित पान मसाला विक्री करत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. कल्याण, डोंबिवली, पलावा, शिळ परिसरातील अनेक नागरिक आपली तलप भागविण्यासाठी या टपऱ्यांवर गर्दी करत असल्याची माहिती आहे.