ठाणे : भिवंडी येथील वंजारपट्टी नाका परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली असतानाच, त्यापाठोपाठ भिवंडीतील धामणगाव परिसरात खड्ड्यामुळे आणखी एका दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागल्याचे बोलले जात आहे. डम्परच्या मागच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून या दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे तोल जाऊन हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
विलास बबन पाटील (५९) असे मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून तो भिवंडीतील पडघा येथील लापे गावात राहत होते. ते सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता कामावरून आपल्या दुचाकीने घरी परतत होते. भिवंडीतील धामणगाव येथील पाईपलाईन रोडने ते दुचाकी घेऊन जात असताना एका डम्परच्या मागच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे त्यांच्या दुचाकीवरून तोल गेला आणि ते डम्परच्या चाकाखाली आल्याचे बोलले जात आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खड्ड्यामुळे आणखी एक मृत्यू
भिवंडीत डॉ. मोहम्मद नसीम अन्सारी या ५८ वर्षीय डॉक्टरांचा २३ ऑगस्ट २०२५ रोजी एका अपघातात मृत्यू झाला होता. वंजारपट्टी नाका परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांची स्कूटी घसरली आणि ते खाली पडले. त्याचवेळी त्यांच्यावरून एका ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ दुचाकीवरून खाली पडून डम्परच्या मागच्या चाकाखाली येऊन विलास पाटील यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सुद्धा खड्ड्यामुळे झाल्याचे बोलले जात असून यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
तपासानंतर अपघाताचे कारण समजु शकेल
धामणगाव येथील पाईपलाईन रोड परिसरात एका डम्परच्या मागच्या चाकाखाली सापडून विलास पाटील या दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चालक डम्पर तिथेच सोडून पळून गेला. त्याचा शोध घेण्यात येत आहे. खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात असले तरी हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू असून त्यानंतर अपघाताचे कारण समजू शकेल, अशी माहिती भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी सांगितले.