ठाणे – भिवंडीतील हनुमान टेकडी परिसर एकेकाळी देह व्यापारासाठी ओळखला जात होता. मात्र परिस्थितीमुळे या भागातील शेकडो महिलांना या विळख्यात जगावे लागत होते. त्यांच्या मुलांचे लहानपण गल्लीबोळात फिरण्यात, शिवीगाळ करण्यात आणि गुन्हेगारीकडे वळण्यात जात होते. मात्र आज या वस्तीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना व त्यांच्या मुलांना नवे आयुष्य मिळाले आहे. या परिवर्तनामागे श्री साई सेवा संस्था आणि संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्वाती सिंह यांचा मोलाचा वाट आहे. या व्यापारातून बाहेर पडलेल्या महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक वर्ग सुरु करण्यात आले आहे. तर भिवंडी पालिका प्रशासनाने यासाठी एक सभागृह देखील उपलब्ध करून दिला आहे.

भिवंडी येथील हनुमान टेकडी परिसरात २०१६ मध्ये डॉ. सिंह यांनी या भागातील महिलांच्या समस्या समजून घेण्यासाठी भेटी देण्यास सुरुवात केली. तेव्हा या वस्तीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक गल्लीबोळांत लहान मुले निष्पापपणे भटकताना दिसत होती. अयोग्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे हे त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले होते. ही मुले कोणत्या वातावरणात जन्माला आली याची त्यांना जाणीवही नव्हती. या मुलांचा कसला दोष? त्यांनाही उज्ज्वल भविष्याचा हक्क आहे,” असा विचार मनात आणून डॉ. सिंह यांनी या मुलांना शिक्षणाच्या मार्गाकडे वळविण्याचे ठरविले आणि त्यासाठी काम सुरु केले.

यानुसार २०१८ मध्ये श्रमजीवी संघटनेच्या मदतीने हनुमान टेकडी परिसरात पहिले अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुले राहू लागली. सुरुवातीला मुलांचा विश्वास जिंकणे कठीण गेले, परंतु सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुले नियमित येऊ लागली. अभ्यासिकेमुळे त्यांच्या वर्तनात व जीवनशैलीत सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. आज अनेक मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. हनुमान टेकडीतील हा उपक्रम देह व्यापाराच्या अंधाऱ्या गल्लींना शिक्षणाचा उजेड देणारा ठरला आहे. महिलांना आत्मसन्मानाचे जीवन मिळवून देणारे आणि मुलांना नवे भविष्य देणारे हे काम आता समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण बनले आहे.

महिलांचा बदलता दृष्टिकोन

या वस्तीतील महिलांची संख्या पूर्वी साधारण १००० ते १५०० होती. मात्र मुलांच्या भविष्याबाबत सतत समुपदेशन, मार्गदर्शन आणि आधार मिळाल्याने आज ती संख्या घटून २०० ते २५० इतकी राहिली आहे. अनेक महिलांनी देह व्यापाराचा मार्ग सोडून नवे आयुष्य स्वीकारले आहे.

प्रशासनाचे सहकार्य

महिला व बालकल्याण विभागाचे माजी अधिकारी माननीय महेंद्र गायकवाड यांच्या सहकार्याने चाईल्ड वेल्फेअर कमिटीमार्फत मुलांना सरकारी वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यात आला. श्री साई सेवा संस्थेच्या मदतीने अभ्यासिका आणि वसतिगृहाची व्यवस्था केली गेली. त्यामुळे आता हनुमान टेकडीतील मुले गुन्हेगारीच्या सावटातून बाहेर पडून शिक्षणाच्या शिस्तीत वाढू लागली आहेत. या उपक्रमाची दखल घेत भिवंडी महानगरपालिकेने अभ्यासिकेसाठी गार्डनमधील एक हॉल उपलब्ध करून दिला आहे. पालिकेकडून प्रथमच असा पुढाकार घेण्यात आल्याने त्याचे कौतुक होत आहे.

ही मुले आता फक्त त्यांच्या आईचीच नाहीत, तर माझीही मुले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हीच माझी खरी कमाई आहे. समाजातील सज्जनांनी या यज्ञात पुढे येऊन हातभार लावावा. कारण हीच मुले उद्याचे भारत घडवणार आहेत.” – डॉ. स्वाती सिंह, अध्यक्ष, श्री साई सेवा संस्था