भिवंडी महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास असमर्थता दाखविणाऱ्या थकबाकीदारांविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून त्या अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याबरोबरच या मालमत्ता नाममात्र दराने ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली आहे. अशाचप्रकारे पाच थकबाकीदरांच्या मालमत्ता लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यास प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे पालिकेने या मालमत्ता नाममात्र दराने ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु केली आहे.

हेही वाचा- कशेळी खाडी पुलावर मातीचे ढिगारे ‘जैसे थे’च; पुलावर अपघातांची भीती कायम

भिवंडी महापालिकेने मालमत्ता करासह इतर करांच्या वसुलीवर गेल्या दोन वर्षांपासून भर दिला आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहेत. त्यानंतरही कर भरण्यास असमर्थता दाखविणाऱ्या थकबाकीदारांविरोधात पालिका कारवाईचा बडगा उगारत आहे. अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता पालिकेने जप्त केल्या आहेत. या कारवाईनंतरही मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी थकबाकीदार पुढे येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अशा मालमत्तांची यादी तयार करून त्यांची लिलाव प्रक्रीया पालिकेने सुरु केली आहे. अशाचप्रकारे जप्त केलेल्या पाच मालमत्तांची लिलाव प्रक्रीया पालिका प्रशासनाने राबविली. त्यामध्ये नारपोली येथील सत्यभामा मुरली सोनी, शंकर भुमय्या कुरे, अशोक लक्ष्मण भोईर व राजेश लक्ष्मण भोईर, किसन बाळू टावरे, हरीश्चंद्र जयराम टावरे व नरसय्या राजय्या गाजूल यांच्या मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांधारकांना थकीत करापोटी मागणी बिल, मागणी नोटीस, जप्तीचे अधिपत्र बजावूनही त्यांनी थकीत कराच्या रक्कमेचा भरणा पालिकेकडे केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव, करमुल्यांकन विभाग प्रमुख सुधीर गुरव, कार्यालयीन अधीक्षक संजय पुण्यार्थी, कर निरीक्षक महेश लहांगे व प्रभाग कार्यालयाकडील भुभाग लिपीक व इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मालमत्ता लिलावाची प्रक्रीया पार पडली. जाहीर लिलाव प्रक्रियेमध्ये कोणत्याही नागरीकांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे या मालमत्ता महापालिकेने नाममात्र बोलीने आपल्या ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

हेही वाचा- ‘ईडी’कडून कल्याण-डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांची चौकशी, बेकायदा बांधकामांचे अहवाल ‘ईडी’, ‘एसआयटी’कडे दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालमत्ता कराचा भारणा केला नाही म्हणून जप्त केलेल्या मालमत्तांसाठी लिलाव प्रक्रीया राबविण्यात आली असून त्यास प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्या मालमत्ता नाममात्र बोलीने आपल्या ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु केली आहे. ही कारवाई पुर्ण होण्याआधी संबंधित मालमत्ताधारकांनी थकीत कराचा भारणा करून त्या मालमत्ता आपल्या ताब्यात घ्याव्यात. तसेच थकीत मालमत्ता कराचा भारणा करून संबंधित मालमत्ताधारकांनी जप्तीची तसेच लिलावाची प्रक्रीया टाळून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.