ठाणे : भिवंडी येथील कशेळी काल्हेर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम बुधवारी सकाळी ९.३० पर्यंत सुरु राहिल्याने त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. अंजुरफाटा ते कशेळी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोंडीमुळे नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. अवघ्या १० ते १५ मिनीटांसाठी वाहन चालकांना पाऊण ते एक तास लागत होता. दुपारनंतर येथील वाहतुक कोंडी काही प्रमाणात सुटली होती.

भिवंडी आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कशेळी, काल्हेर ते भिवंडी मार्गावरून अवजड वाहनांची वाहतुक होते. तसेच कशेळी, काल्हेर भागात नागरी वस्ती वाढल्याने मार्गावरुन हजारो प्रवासी ठाणे किंवा भिवंडीच्या दिशेने वाहतुक करतात. या मार्गावर ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रो पाच मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री एमएमआरडीएने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने अचानक कशेळी येथे कामाला सुरुवात केली. हे काम बुधवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत सुरु राहिले.

सकाळी या मार्गावरून वाहतुक अधिक होत असल्याने कशेळी ते अंजुरफाटा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भिवंडीत गोदामे, कारखाने, वस्तू विक्रींची दुकाने आहेत. या ठिकाणी हजारो नोकरदार कामानिमित्ताने जातात. वाहतुक कोंडीमुळे या नोकरदारांना पायी जाण्याची वेळ आली. वाहतुक कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना अवघ्या १० ते १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी पाऊण ते एक तास लागत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.