भिवंडी शहरातील जातीय सलोखा आणि शांतता राखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारी ‘कौमी एकता समिती’ आता अधिक व्यापक करण्यात येणार असून हा ‘पॅटर्न’ ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील अन्य शहरांतही राबवण्यात येणार आहे. मुंब्रा, कौसा तसेच कल्याण परिसरातील संवेदनशील भागांसह सर्वच परिसरात ‘कौमी एकता’च्या धर्तीवर समित्यांची स्थापना करण्यात येणार असून त्यांच्या कामांचे दर तीन महिन्यांनी मूल्यमापन केले जाणार आहे.
छोटय़ा कारणांवरून किंवा गैरसमजांमधून दोन समाजांत धार्मिक तेढ निर्माण होते आणि तिचे पर्यवसन जातीय दंगलीत होते. अनेक समाजविघातक प्रवृत्ती त्याचा फायदा घेऊन तरुणांची माथी भडकवितात. यामुळे दंगली शमविण्याऐवजी त्या आणखी पेटतात. भिवंडी परिसरात भूतकाळात अनेक दंगलींनी अनेकांचे बळी घेतले. त्यामुळे भिवंडीत जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी पोलिसांमार्फत ‘कौमी एकता समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये दोन्ही समाजांतील नेते आणि प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश करण्यात आला. या समितीच्या माध्यमातून दोन समाजांमध्ये जातीय सलोखा राखण्याचे काम यशस्वीपणे झाले.
मात्र, या समितीच्या कामाचे स्वरूप जातीय सलोखा राखण्यापुरतेच असल्याने अलीकडच्या काळात तिचा प्रभाव कमी होत चालला होता. या पाश्र्वभूमीवर भिवंडी पोलीस परिमंडळाचे उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी, मौलवी, पुजारी यांचा या समितीत समावेश करण्यात आला. पोलिसांच्या माध्यमातून या समितीमार्फत भिवंडीतील प्रत्येक नगरात जातीय सलोखा, नशामुक्ती, महिला व बाल अत्याचार आदी विषयांवर जनजागृती मोहिमांमधून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. हा ‘भिवंडी पॅटर्न’ आता संपूर्ण पोलीस आयुक्तालयात लागू करण्यात आला आहे.
भिवंडी शहरात या पूर्वी कौमी एकता समितीमध्ये दहा ते वीस सदस्य कार्यरत होते. या समितीची नव्याने पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे आता समितीमध्ये शंभरहून अधिक सदस्य झाले असून त्यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे. हे सदस्य आपआपल्या समाजाला चांगल्या प्रकारे एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून देऊ शकतात आणि त्यामुळे समाजप्रबोधनाचे चांगले काम साध्य होऊ शकते.
– सुधीर दाभाडे, पोलीस उपायुक्त
परिमंडळातील समितींना बक्षिसे
गेल्या आठवडय़ात घोडबंदर येथील मंथन सभागृहात ठाणे पोलीस आयुक्तालयातील ‘कौमी एकता समिती’ची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ‘भिवंडी पॅटर्न’ संपूर्ण आयुक्तालयात राबविण्याच्या सूचना दिल्याचे ठाण्याचे प्रभारी पोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले. त्याचबरोबर परिमंडळातील समित्यांच्या कामांचे मुल्यमापन करून त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.