बदलापूरः गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी आणि प्रसिद्धीपूर्वीच वादात सापडलेली कुळगाव बदलापूर नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना अखेर सोमवारी जाहीर करण्यात आली. यापूर्वीच्या चर्चांप्रमाणे या यादीत नदी ओलांडून प्रभाग क्रमांक दोनची रचना करण्यात आली आहे. तर मांजर्ली, मोहनानंदनगर सारख्या एकाच प्रभागात राहणाऱ्या परिसराला तीन वेगवेगळ्या प्रभागात विभाजीत करण्यात आले आहे.

अनेक वजनदार माजी नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित झाल्याची चर्चा असून भाजपच्या दोन महत्वाच्या माजी नगरसेवकांची कोंडी झाल्याची चर्चा आहे. या प्रभाग रचनेवर २०२२ च्या रचनेची छाप आहे. या प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्टपर्यंत सूचना आणि हरकती मांडता येणार आहे.कुळगाव बदलापूर नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी जाहीर करण्यात आली. शहराची एकूण लोकसंख्या १ लाख ७४ हजार २२६ इतकी आहे. शहरातील नगरसेवकांची संख्या ४९ असणार आहे. शहरात एकूण २४ प्रभाग असून त्यातील प्रभाग क्रमांक १५ हा एक प्रभाग तीन सदस्यीय असणार आहे. तर इतर २३ प्रभाग दोन सदस्यीय असणार आहेत. प्रभागातील सरासरी लोकसंख्या साडे सहा हजार इतकी आहे. बदलापूर पश्चिमेत ११ तर पूर्व भागात १३ प्रभाग आहेत. अनेक प्रभागांचे सीमांकन करताना २०२२ च्या तुलनेत किंचीत बदल करण्यात आले आहेत. लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग क्रमांक १६ हा सर्वात लहान प्रभाग ठरला आहे.

या प्रारूप प्रभाग रचना यापूर्वीच फुटल्याची चर्चा शहरात रंगली होती. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी यात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. नदी, राज्यमार्ग यांच्या सीमा ओलांडून प्रभार रचना करण्यात आल्याचे दिसून आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन हा द्वीसदस्यीय प्रभाग मोहनानंद नगर ते थेट बदलापूर गावापर्यंत विस्तारला आहे. भौगोलिकदृष्ट्या हे जवळपास चार किलोमीटरचे अंतर आहे. तर पूर्वेतील प्रभाग क्रमांक १५, २१ आणि २४ हे यात प्रभागातून राज्यमार्ग जातो आहे. प्रभाग तीन मुख्य नाला ओलांडून जातो आहे.

काही प्रभागात प्रगणन गट बदलल्याने आरक्षणात बदल झाले आहेत. त्याचा फायदा सत्तेतील काही उमेदवारांना होणार आहे. भाजप आमदार किसन कथोरे या प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप घेत असले तरी काही भाजपचे माजी नगरसेवक आणि इच्छुक नगरसेवकांनी खासगीत प्रभार रचनेवर समाधान व्यक्त केले आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रसच्या गोटात समाधानाचे वातावरण आहे. अनेक वजनदार माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यात सुरक्षित झाल्याची चर्चा आहे. तर नवख्या माजी नगरसेवक आणि उमेदवारांचे मात्र अस्तित्व धोक्यात आले आहे.

पश्चिमेतील भाजपच्या दोघांना फटका ?

बदलापूर पश्चिमेतील नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असलेल्या भाजपच्या दोन दिग्गज माजी नगरसेवकांना प्रारूप प्रभाग रचनेत धक्का बसला आहे. त्यामुळे ते यावर आक्षेप घेण्याच्या तयारीत आहेत. पूर्व भागात भाजप पदाधिकाऱ्यांत समाधान आहे. शिवसेनेच्या वतीने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अभ्यास सुरू असून लवकरच त्यावर बोलू अशी प्रतिक्रिया काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मी सांगितल्याप्रमाणे फुटलेली प्रभाग रचना अधिकृतपणे जाहीर झाली. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेणार आहे. मी सांगितलेले आक्षेपाचे मुद्दे प्रारूप रचनेत दिसून येत आहेत. यात गैरप्रकार झालेला आहे. – किसन कथोरे, आमदार, मुरबाड.