शहापूर : मुंबई – नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराचा शनिवारी मृत्यू झाला. तर यामध्ये एक जण जखमी झाल्याची घटना आसनगाव रेल्वे पुलाजवळ घडली. या घटनेमुळे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई नाशिक महामार्गावरून दुचाकीवर एक तरुण वासिंद येथे आपल्या घरी जात होता.

तो घरी जात असताना मुंबई – नाशिक महामार्गावर आसनगाव येथे पडलेल्या खड्ड्यांमध्ये त्याची दुचाकी खड्ड्यात जोरात आदळून पडली. यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या प्रकाश बोन्द्रे (४०) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर रघुनाथ वेखंडे हे अपघातात जखमी झाले. त्यांना शहापुर उपजिल्हारुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई – नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून लहान – मोठ्या अपघातांसह खड्ड्यांमुळे वाहनात बिघाड होण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार देखील होत आहेत. महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील खड्डे तातडीने भरून घ्यावेत अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. या अपघाताबाबत शहापुर पोलीस अधिक तपास करीत आहेत.