शहापूर : इंटरनॅशनल वेटलँड आणि वनविभागाच्या माध्यमातून अभयारण्यातील तानसा, मोडकसागर तलावांसह पाणवठ्यावर पक्ष्यांची गणना करण्यात आली. या पक्षी गणनेत ३५ पाणपक्ष्यांसह ७५ पक्ष्यांची नोंद झाली आहे. दरवर्षी हिवाळ्यात करण्यात येणाऱ्या पक्षी गणनेत स्थलांतरित पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांची नोंद करण्यात येते. यंदा नकट्याबदक, थापट्याबदक, भुवई, तलवारबदक या पाणपक्ष्यांसह कॉमन सँडपायपर, ग्रीन सँडपायपर, वुड सँडपायपर, कॉमन ग्रीनशँक अशा पक्ष्यांची नोंद झाली आहे.

हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने थंड प्रदेशातून विविध प्रकारचे पाण पक्षी तानसा अभयरण्यासह पाणवठ्यावर येतात. तानसा तलावासह, नदीपात्र व अभयारण्यातील पाणवठ्यांवर शनिवारी सकाळी सहा वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यावेळी नकट्याबदक, थापट्याबदक, भुवई, तलवारबदक, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी या पाणपक्ष्यांसह चिखले पक्षी देखील आले होते. यामध्ये कॉमन सँडपायपर, ग्रीन सँडपायपर, वुड सँडपायपर, कॉमन ग्रीनशँक यांसह गार्गेनी, नॉर्दर्न शोव्हलर, गॅडवॉल, युरेशियन विजियन, नॉर्दर्न पिंटेल, ग्रीन विंग्ड टील, ब्लॅक विंग स्टिल्ट, लिटल रिंग्ड प्लोव्हर, रेड वॅटल्ड लॅपविंग, फिजंट टेल जकाना, रिव्हर टर्न, लिटिल ग्रेब, एशियन ओपनबिल, पेंटेड स्टॉर्क, लिटिल कॉर्मोरंट, ग्लॉसी आयबिस, ब्लॅक हेडेड आयबिस, रेड नेप्ड आयबिस, लिटिल एग्रेट, इंडियन पॉन्ड हेरॉन, कॅटल एग्रेट, ग्रेट एग्रेट, मीडियम एग्रेट, ग्रे वॅगटेल, वेस्टर्न यलो वॅगटेल अशा ७५ पक्ष्यांची नोंद झाली आहे.

हेही वाचा…ठाण्यात टाकाऊ वस्तुंपासून पालिकेने बनविल्या कलाकृती, पुर्नवापरचा संदेश देण्यासाठी पालिकेचा उपक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक अक्षय गजभिये, साहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रेय मिसाळ यांच्या मार्गदर्शनाने खर्डी, तानसा, वैतरणा व परळी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ रोंगटे, रमेश रसाळ, प्रकाश चौधरी, आणि पवार यांच्या सहकार्याने घुबड संवर्धन संस्थेचे वन्यजीव अभ्यासक व पक्षी निरीक्षक रोहीदास डगळे यांनी तानसा अभयारण्यात पाणपक्षी गणना केली.