भाजप नेते आशिष शेलार यांचा इशारा
राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाली असल्यामुळे आम्ही युतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगत राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी कल्याण पश्चिमेतील बंडखोर उमेदवार नरेंद्र पवार यांना धक्का दिला आहे. दोन्ही पक्षांचे नेते सक्षम असून ते बंडखोरांवर कारवाई करण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
कल्याण पश्चिम मतदारसंघात भाजपचे आमदार नरेंद्र पवार तर कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे धनंजय बोडारे या दोघांनी बंडखोरी केली आहे. नरेंद्र पवार यांच्या पाठीमागे भाजपची कुमक उभी राहील असून बोडारे यांच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे या ठिकाणी युतीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे युतीचे नेते कुणाचा प्रचार करणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
या संदर्भात शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना ठाण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली असून आम्ही सर्वजण युतीच्याच उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले.
दोन्ही पक्षाचे पदाधिकारी किंवा अन्य कुणी उभे असतील तर त्यांच्यावर पक्षाच्या कार्यपद्धती प्रमाणे कारवाई करण्यात येईल. बंडखोरांमुळे आमच्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. शिवसेनेतील नाराजांची समजूत त्यांच्या पक्षाचे नेतृत्व चांगल्या पद्धतीने काढेल, असे शेलार यांनी सांगितले.