उल्हासनगर शहरात असलेली रिपाइं मतांची मोठी संख्या आणि त्याच वेळी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या नगरसेवकाने बंडखोरी करत दाखल केलेल्या उमेदवारीमुळे शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार कुमार आयलानी यांची धाकधूक वाढली आहे. विशेष बाब म्हणजे आपल्या उमेदवारीनंतर भगवान भालेराव यांनी लागलीच जाहीरनामा प्रसिद्ध करत त्याची प्रत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना सादर केल्याने त्या भेटीची चर्चा उल्हासनगरात रंगली आहे. त्यामुळे रिपब्लिकन मतांना आकर्षित करण्याच बंडखोर उमेदवार यशस्वी ठरल्यास भाजपची चिंता वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
रिपब्लिकन मतांची संख्या अधिक असलेल्या भागात सर्वाधिक मतदान झाल्याचे विविध निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. उल्हासनगर विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी आचारसंहितेपूर्वीच दावा सांगण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी शक्तिप्रदर्शन करत केंद्रीय मंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र शिवसेना, भाजप आणि रिपाइंसह मित्रपक्षांची युती झाल्याने ही जागा भाजपला गेली. त्यानंतरही भगवान भालेराव यांनी अपक्ष अर्ज दाखल करत युतीला धक्का दिला. त्यामुळे उल्हासनगरात भाजप उमेदवार कुमार आयलानी यांची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जाते. आपल्या उमेदवारीनंतर भालेराव यांनी मंगळवारी आपला जाहीरनामाही प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यावर रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या नावाचा उल्लेख असून रामदास आठवले यांची छबीही छापण्यात आली आहे. त्यामुळे रिपब्लिकन मतदार भालेराव यांच्याकडे वळण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
रामदास आठवले यांचाही पाठिंबा?
भालेराव यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी थेट रामदास आठवले यांना हा जाहीरनामा सादर केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे रिपाइंच्या बंडखोर उमेदवाराला रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांचाही पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. या घडामोडींमुळे भाजप उमेदवार कुमार आयलानी यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.