Ganesh Naik’s Janata Darbar in Thane : ठाणे : एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली, असे विधान वनमंत्री व भाजपचे नेते गणेश नाईक ( Ganesh Naik ) यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नाईक विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे नेते असा सामना रंगल्याचे चित्र आहे. असे असतानाच, गणेश नाईक यांनी रविवारी ठाण्यात एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि त्यावेळी पत्रकारांशी बोलताना येत्या २२ ऑगस्टला ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली. अगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या ठाणे शहरात होणारा नाईकांचा जनता दरबार राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात असून त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर हे ओळखले जाते. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. याच बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा करत मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला होता. त्यावर शिंदेच्या शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्याला प्रतिउत्तर देत ठाणे हे आपले सर्वांचेच असल्याचे सांगत या शहरातील अडीअडचणी सोडविण्यासाठी गरज पडली तर, अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, असे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले होते. नाईक यांच्या विधानानंतर भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट)असा सामना रंगला होता.
जनता दरबाराची घोषणा
नवी मुंबई येथील ऐरोलीमध्ये झालेल्या एका मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांना टोला लगावला होता. मी कधीही दरबारी राजकारण केले नाही असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. तेव्हापासूनच दोन्ही नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. असे असतानाच, गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आणखी एक विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली, असे विधान नाईक यांनी केले होते. त्याला खासदार नरेश म्हस्के आणि नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी प्रतिउत्तर दिले होते. यावरून नाईक विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे नेते असा सामना रंगल्याचे चित्र आहे. त्यातच ठाण्यातील भाजपच्या एका कार्यक्रमाला गणेश नाईक यांनी उपस्थिती लावून येत्या २२ ऑगस्टला ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली. हा दरबार पालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदे विरुद्ध भाजप संघर्षाची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत.
जनता दरबाराची जागा बदलली
ठाणे महापालिकेच्या मानपाडा येथील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात २२ ऑगस्टला जनता दरबार घेण्यासाठी गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला पत्र दिले होते. परंतु ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले गडकरी रंगायतन दुरुस्ती कामासाठी बंद होते. दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने त्याचे गेल्या आठवड्यात लोकार्पण झाले. नाट्यगृह खुले झाल्याने नाईक यांनी जनता दरबाराची जागा बदलली असून त्यांचा जनता दरबार आता २२ ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.