कल्याण – आपण कोणाच्या प्रचार फेरीत सहभागी झालो म्हणून त्यांचा प्रचार केला असे होत नाही. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात आपणास तेथील मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचे आमंत्रण होते. तेथे आपण गेलो होतो. त्यावेळी तेथे ठाकरे गटाच्या उमेदवाराची प्रचार फेरी असेल असे आपणास माहिती नव्हते. त्यामुळे आपण सहज त्या कार्यक्रमात सहभागी झालो. आपण उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार फेरीत सहभागी झालो नव्हतो, असे स्पष्टीकरण भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांनी मंगळवारी घाईघाईने माध्यमांना दिले.

हेही वाचा >>> आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार, वैशाली दरेकरांसोबत रॅलीत सहभागी

भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्या कार्यालयात घाईघाईने बोलविलेल्या पत्रकार परिषदेत सुलभा गायकवाड यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही माहिती दिली. आपण चैत्र पाडव्याच्या दिवशी कल्याण पूर्वेतील नववर्ष स्वागत यात्रेत वैशाली दरेकर यांना भेटलो असलो तरी त्यांना कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या आणि मंगळवारी गोरपे गावातील त्यांच्या प्रचार फेरीत सहभागी असलो तरी आपण त्यांचा प्रचार केला नाही किंवा त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत, असे स्पष्टीकरण सुलभा गायकवाड यांनी दिले.

कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आपण प्रचार करणार का, या प्रश्नाला बगल देताना सुलभा यांंनी आपण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी पूर्ण ताकदीने भाजप समर्थक उमेदवाराचा प्रचार करणार आहोत. आपण निवडणुकीत कोणाचा प्रचार करावा यासाठी आपल्यावर महायुती किंवा महाआघाडीकडून कोणाचाही दबाव नाही, असेही सुलभा यांनी स्पष्ट केले. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे येथील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रचार फेरीत सहभागी झाल्यानंंतर घाईघाईने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महायुतीत आता दुभंग नको म्हणून घाईघाईने सुलभा गायकवाड यांना स्पष्टीकरण देण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.