शरद पवार यांचा आरोप

राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपने साधन-संपत्तीचा वापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. तसेच निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मतदार यादी आणि मतदान यंत्रामध्ये घोळ या सर्वाला दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. पराभव हा पराभवच असतो. त्यामुळे आम्ही पराभव मान्य करून त्यामागची कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे अडीच वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेना यांच्यातील ऐक्य जितके दिवस टिकेल, तितके दिवस राज्यातील सरकार टिकेल, असे ते म्हणाले.

ठाणे महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्षाने आयोजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी शरद पवार ठाण्यात आले होते. या बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपावर टीका केली.

राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपने निवडणुकांमध्ये साधन-संपत्तीचा मोठय़ा प्रमाणात वापर केला असून पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये असा प्रकार घडला. मात्र साधन-संपत्तीचा वापर करून जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या एकूण मतांपेक्षा सुमारे चार लाख मते राष्ट्रवादीला कमी मिळाली आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा आजही राष्ट्रवादीला पाठिंबा आहे, असेही पवार म्हणाले.

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये समविचारी पक्ष एकत्र आले तर जिल्हा परिषदांमध्ये वेगळे चित्र दिसेल. त्यामुळे समविचारी पक्षांनी एकत्र यावे म्हणून त्यांच्यासोबत  काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठका सुरू आहेत. जिल्हा परिषदांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत हवी तशी आघाडी होऊ शकली नाही आणि निवडणुकीपूर्वी काही नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले. तसेच महापालिकेत पक्षाचे नेतृत्व करणारे नगरसेवकही दुसऱ्या पक्षात गेले. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर झाल्यामुळे राष्ट्रवादीला यश मिळू शकले नाही. हे सर्व घडले नसते तर पक्षाचे आणखी दहा ते पंधरा नगरसेवक निवडून येऊ शकले असते.

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस