ठाणे : भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते शनिवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आमनेसामने आले होते. फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने  शिवसेनेच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सरकारविरोधात निषेध स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली, तर त्याच वेळी ठाणे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनानिमित्त मोदींनी केलेल्या विकासकामांच्या फलकाचे स्थानक परिसरात अनावरण करण्यात आले. या वेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपकडून देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात मोदी सरकारच्या विकासकामांची माहिती सांगणार मोठा फलक लावण्यात आला होता. त्याच्या अनावरणासाठी  भाजपचे कार्यकर्ते स्थानक परिसरात जमले होते. तर वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या कोटय़वधींची गुंतवणूक असलेला आणि लाखो तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेल्याने सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून कडाडून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेच्या वतीने सरकारच्या विरोधात स्थानक परिसरातच निषेध स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.   

जनता धडा शिकवेल – खा. राजन विचारे

राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक आहे. तरुणांना रोजगाराची गरज आहे. असे असताना हजारो तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला कसा जातो? ज्यांनी हा प्रकल्प गुजरातला नेला आहे त्या सर्वाना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल. तसेच नरेंद्र मोदींनीदेखील महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याच्या विचार करून फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्राला द्यावा. असे मत शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी या स्वाक्षरी मोहिमेच्या उपक्रमात व्यक्त केले. तर मुख्यमंत्री हे मूळ ठाणेकर आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विकासाबरोबरच ठाणे शहराला भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असे मत शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी या वेळी व्यक्त केले.

महाविकास आघाडीमुळेच प्रकल्प गेला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या काळात शिंदे-फडणवीस सरकार जोमाने काम करेल, असे मत फलकाच्या अनावरणावेळी उपस्थित असलेले भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी व्यक्त केले. तर फॉक्सकॉन प्रकल्प केवळ महाविकास आघाडीमुळेच राज्याबाहेर गेल्याची टीका या वेळी उपस्थित असलेले भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली.