दिव्यातील खड्डय़ांवरून मॅरेथॉनचे आयोजन; महापालिका निवडणुकांसाठीची रणनिती

महापालिका निवडणुकांचा हंगाम जवळ येऊ लागताच दिव्यातील नागरी सुविधांचा प्रश्न चांगलाच गाजू लागला असून या भागातील खड्डय़ांमधून मॅरेथॉन भरवत शुक्रवारी भाजपने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून निवडून आलेल्या दिव्यातील दोघा नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागातील राजकारण रंगले असून भाजपने येथील नागरी प्रश्नांवर आंदोलन करत शिवसेनेच्या या संभाव्य उमेदवारांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दिव्यात होऊ घातलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी एकीकडे सेना प्रयत्न करीत असतानाच युतीतील सत्तेत असलेल्या भाजपा या मित्रपक्षाने मात्र शिवसेनेला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडलेली नाही. ठाणे महापालिका निवडणूक तोंडावर आल्याने आता सर्वपक्षीय कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. दिवा शहरात गेल्या काही महिन्यांपासून खड्डय़ांचा प्रश्न गाजत आहे. ‘जागा हो दिवेकर’ या संघटनेच्या वतीने काही दिवसांपूर्वीच खड्डय़ांचा निषेध करण्यासाठी बैलगाडी मोर्चाद्वारे आंदोलन करीत बिगुल फुंकले होते, तर आता सत्ताधारी पक्षात असलेल्या भाजपाने शिवसेनेवर शरसंधान करीत खड्डे मॅरेथॉन भरवत पालिका प्रशासन आणि अकार्यक्षम लोकप्रतिनिधींचा निषेध केला. भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संयुक्त सार्वजनिक जयंती कमिटी दिवा विभाग यांच्या वतीने शुक्रवारी सकाळी १० वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धिविनायक गार्डन दिवा चौक येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. तेथून मार्गस्थ होत, दिवा रेल्वे स्टेशन परिसर, मुंब्रा कॉलनी रस्ता मार्गे गणेशनगर येथे स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

खड्डे मॅरेथॉन स्पर्धेत शहरातील दोनशे ते तीनशे नागरिक सहभागी झाले होते. दिवा विभागातून कोटय़वधींचा निधी आज पालिकेच्या तिजोरीत जमा होतो. असे असताना दिव्यात फारशी विकासकामे होत नाहीत, अशी टीका यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पाणी गटारे, रस्ते व अस्वच्छता यामुळे दिव्यातील जनजीवन कोलमडून गेले आहे. मोकळ्या जागा, उद्याने, मैदाने मनोरंजनाची ठिकाणे, याची अपेक्षा करणे म्हणजे दिवा स्वप्नच उरले आहे अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिली. रस्त्यांची अवस्था बकाल झाली असताना मागील पाच वर्षांत प्रमुख रस्त्यांची नव्याने बांधणी तर सोडाच साधी डागडुजी करण्यात प्रशासनाला व स्थानिक लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. दिवा आगासन रस्ता, दिवा स्टेशन शीळ रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य आहे. दिवा विभागातील सर्वात जास्त वर्दळीच्या मुंब्रा देवी कॉलनी रस्त्यावर तर नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. दिवा परिसरातील साबे गावात जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था देखील वाईट आहे. नालेसफाई न झाल्याने सर्व सांडपाणी रस्त्यावर जमा झाले असून परिणामी प्रचंड रोगराई पसरली आहे. बारा महिने असलेली पाणीटंचाई अशा एकंदरीत सर्व समस्यांचा आज निषेध करण्यात आल्याचे भाजपाचे दिवा शीळ विभागाचे अध्यक्ष आदेश भगत यांनी सांगितले. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्याचे निवेदन प्रशासनाला  दिले .

केक कापून अनोखे आंदोलन

काही स्पर्धकांनी यावेळी खड्डय़ातून धावण्याचा निर्धार केला परंतु कोणी जखमी होऊ नये तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव खड्डय़ांतील रस्त्यावरून चालत सर्वाना पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला. गेल्या पाच वर्षांत दिवा शहरातील रस्त्यांची डागडुजीच केली गेली नसल्याने नादुरुस्त रस्त्यांचा पाचवा वाढदिवसही यावेळी कार्यकर्त्यांनी केक कापून साजरा केला.