कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांचा श्वास नागरी समस्यांमुळे गुदमरला आहे. या गुदमरलेपणातून नागरिकांची सुटका करण्यासाठी, विकासाचे महत्वकांक्षी प्रश्न मार्गी लावायचे असतील तर कल्याण डोंबिवली महापालिकेवर येत्या काळात भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसणे आवश्यक आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

कल्याण मधील महाजनवाडी सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी येत्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर असणे किती महत्वाचे आहे हे शहरात निर्माण झालेल्या नागरी समस्या, रखडलेले विकास प्रकल्पांच्या माध्यमातून सांगितले. या कार्यक्रमाला भाजप नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील, आमदार सुलभा गायकवाड, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात विकासाचे अनेक नवीन प्रकल्प राबविले जात आहेत. विकासाचा हा झंझावात पाहून राज्याच्या विविध भागातील अन्य पक्षांमधील नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशाच पध्दतीने कल्याण, डोंबिवली शहर परिसर आपणास आता भाजपमय करायचा आहे. यासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या उत्कर्षासाठी एकत्रितपणे कामाला लागायचे आहे, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून शांत बसून राहू नका, आपल्या शहर परिसरातील नागरिकांच्या नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी कामाला लागला. त्यांचे पालिका आणि इतर शासकीय यंत्रणांशी निगडित प्रश्न सोडविण्याच्या मागे लागा, अशाही सूचना प्रदेशाध्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

कल्याण शहरातील सामाजिक वर्तुळात सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांचे नाव आहे. व्यापारी संघटना, गुजराथी, मारवाडी असा मोठा समाज वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे प्रजापती यांनी आपल्या पक्षात दाखल व्हावे असे प्रयत्न यापूर्वी अनेक पक्षांनी केले, पण त्याला प्रजापती यांनी होकार दर्शवला नव्हता. आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता जतिन प्रजापती यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि सहकारी जोरदार प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. भाजपचा विकासाचा झंझावत पाहून प्रजापती यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले. रविवारी त्यांना जाहीर कार्यक्रमात भाजपमध्ये त्यांच्या समर्थकांसह प्रवेश देण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यक्रमाला माजी शहराध्यक्ष वरूण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, मंडल अध्यक्ष रितेश फडके, स्वप्निल काठे, आमित धाक्रस उपस्थित होते. भाजपने कल्याण परिसर भाजपमय करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्याने शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. मागील वीस वर्ष कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असली तरी पालिकेवर आपली हुकमत ठेवण्यात शिंदे शिवसेनेने बाजी मारली होती. त्यामुळे येत्या काळात शिवसेना-भाजपमध्ये पालिकेतील सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.